पुणे: देव तारी त्याला कोण मारी असाच प्रत्यय डोंबिवली येथील ट्रक चालकाला आला. पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील बोरघाटात 40 फूट खोल अंधारमय खड्ड्यात चालक पडला. पण नशीब चांगलं होतं म्हणून या चालकाचा जीव अगदी थोडक्यात वाचला.
पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील बोरघाटात पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोचा चालक खंडाळा बोरघाटातून प्रवास करत असताना आयशर ट्रकचे डिझेल संपले आणि गाडीने एयर पकडले त्यामुळे ट्रक पडला. द्रुतगती मार्गावर बंद पडल्यामुळे चालक विकास राऊत हा फोनवर मदतीसाठी संपर्क करत असताना त्याच्या फोनची बॅटरी संपली. त्याच दरम्यान, विरुद्ध दिशेला पुण्याकडे जाणारा एक ट्रक उभा होता. त्या ट्रकमध्ये मोबाईल चार्जिंग करण्यासाठी हा चालक एक्स्प्रेस वेवरील रस्ता क्रॉस करत असतानाच. रस्त्याच्या मधोमध असलेले चेंबर त्याच्या लक्षात आले नाही आणि अचानक त्या चेंबरमध्ये तो कोसळला.
40 फूट खोल असलेल्या या चेंबरमध्ये पडल्यामुळे त्याने जीवाच्या आकांताने त्याने ओरडण्यास सुरुवात केली असता पलीकडे बंद असलेल्या गाडीतील ड्रायव्हरने त्या आवाजाचा अंदाज घेतला तेंव्हा चेंबरमध्ये जखमी अवस्थेत पडल्याचे लक्षात आले. त्या ड्रायव्हरने समय सूचकतेने रायगड आणि खंडाळा टॅब पोलीस हेल्पलाइनवर फोन केला. तात्काळ बोरघाट वाहतूक पोलीस, देवदूत रेस्क्यू टीम, आयआरबी पेट्रोलिंग, खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे टीम घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी देवदूतच्या टीमने खाली जाऊन अंदाज घेतला असता चालक गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्याला स्ट्रेचरला रोपने बांधले आणि नंतर सर्वांनी त्या खोल चेंबर मधून चालकाला वर काढले इतक्या उंचीवरुन पडल्यामुळे या चालकाचे हात, पाय आणि कंबरडे मोडून मोठी दुखापत झाली होती. या जखमी आयशर ट्रक चालकाला पुढील उपचाराकरीता मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. दैव बलवत्तर म्हणून या गंभीर अपघातातून देखील चालक बचावल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.