रत्नागिरीतील  कर्ला ग्रुप ग्रामपंचायतीच्या बेबंदशाही, अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी आज मंगळवार 15 रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मस्जिद ग्रवयार्ड स्कूल कर्ला, जमातूल मुस्लिमिन कर्ला, इंतीजामिया कमिटी, कर्ला वेल्फेअर कमिटी, कर्ला ग्राम विकास कमिटी यांनी ग्रामपंचायत सरपंचांना निवेदन दिले.

कर्ला परिसरात पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य, नियमित देखभाल आणि पाण्याच्या अभावामुळे मोडकळीस आलेली स्वच्छतागृहे, कचराकुंड्या, खड्ड्यात हरवलेले रस्ते आणि रिक्षा व वाहनचालकांचे हाल, आजारी माणसांचे हाल, थेंबथेंब मिळणारे गढूळ अशुद्ध पाणी आणि त्यामुळे सर्वाच्याच आरोग्यावर होणारे दूरगामी दुष्परीणाम वर्षानुवर्षे निमुटपणे भोगत लागत आहेत असे निवेदनात म्हटले आहे. पण आता बस्स झाले. हे सर्व आता आपल्याला बदलावयाचे आहे. स्वच्छ शुद्ध पाणी मिळणे हा आमचा हक्क आहे आणि ते पुरविण्याची कायदेशिर जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. तसेच योग्य पध्दतीने डांबरीकरण झालेले नाही. खड्डेमुक्त रस्ते हा देखील आमचा हक्क आहे आणि ते करण्याची कायदेशिर जबाबदारी देखील ग्रामपंचायतीचीच आहे.

स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे, सुंदर स्वच्छ गावचा परीसर हा आमचा हक्क आहे तसेच तरुणांच्या गुणाना वाव देण्यासाठी मैदान होणे आवश्यक आहे पण आजपर्यंत आश्वासनापलीकडे काहीच झाले नाही. त्यासाठी उपाय योजना करणे देखील ग्रामपंचायतीचेच कर्तव्य आहे.

 ग्रामपंचायतीचा कारभार पुर्णतः भरकटलेला असून सामान्य नागरीक राजकारणापासून चार हात दूर राहाणेच पसंत करतात. आजकाल समाजकारण करणारे लोकही राजकारणात पडत नसल्यामुळे केवळ आपलीच पोळी भाजून घेणाऱ्यांना अक्षरशः रान मोकळे मिळालेले आहे. म्हणूनच समविचारी कर्ला ग्रामस्थांच्या सभेमध्ये सामाजिक तथा राजकीय चळवळ उभारण्याचा निर्णय घेउन आज मंगळवार दि. 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता कर्ला कार्यालयावर ग्रामस्थांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. 

स्वतःचा विकास करुन घेण्यासाठीच आपल्या पदांचा उपयोग करणाऱ्याना योग्य मार्ग दाखविण्यासाठी चळवळीची ही एक सुरुवात आहे याची आपण नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. 

कायदे व नियम यांना न जुमानता तोडली जाणारी कांदळवने आणि खाजणे, सार्वजनिक रस्त्यांवर केले जाणारे अतिक्रमण, भूखंडांच्या लोण्यासाठी अहोरात्र धडपडणारे सत्ताधारी या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी आता राजकीय बळ वाढत आहे. मोर्चाची गांभिर्याने दखल घेऊन आपल्या कारभारात पारदर्शकता आणावी. त्यासाठी ग्रामपंचायतीचा संपुर्ण कारभार संगणकीय करावा. ग्रामसभांचे आयोजन नियमितपणे आणि गांभीर्याने करावे. ग्रामसभेमध्ये विषयानुरूप एक, दोन व तीन वर्षात ग्रामविकासाच्या दृष्टीने अमलात आणावयाच्या योजनांवर विचार व्हावा. त्यासाठी तज्ञ ग्रामस्थांची समिती नेमावी. नागरीकांचे म्हणणे, त्यांच्या मागण्या यांकडे गांभिर्याने लक्ष घालावे. त्यांच्या पत्राना तातडीने उत्तरे द्यावी. तसेच सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असेही नमूद करण्यात आले आहे.

गाव हागणदारी मुक्त पण संडासचे सौच सेफ्टीक टैंक न बांधता पाईपव्दारे खाडीत सोडले जाते. वार्ड क्रमांक 2 व 3 यामध्ये सुमारे 300 घरांचे सांडपाणी तिथेच घराजवळ सोडलेले आहे. न्यू कर्ला मध्ये प्रत्येक निवडणुकीत सांडपाण्याची सोय करू असे आश्वासन दिले होते मात्र त्याचे काय झाले असेही म्हंटले आहे.