मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणासाठी माथ्यावरील डोंगर कटाईसह माती भरावाच्या कामासाठी घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याचा विचार सुरु आहे. आता डोंगर कापण्याचं काम सुरु असताना घाटातील वाहतुकीला फटका बसू नये, चौपदरीकरणाचा भराव आणि रुंदीकरणाचं काम वेगाने व्हावं, यासाठी घाटातील वाहतूक काही दिवस बंद ठेवण्याचा प्रशासनाचा विचार सुरु आहे. परंतु घाट बंद केल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांचा, अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे घाट पुन्हा बंद करु नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

प्रशासन लवकरच याबाबत निर्णय घेईल, अशी शक्यता आहे. परंतु परशुराम घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. घाट पुन्हा बंद झाल्यास विद्यार्थी, शेतकरी तसंच नोकरदारांनी वाहतूक करायची कशी? असा थेट सवालही विचारला जात आहे.

या वर्षाच्या उन्हाळ्यात आणि त्या नंतरच्या पावसाळ्यात परशुराम घाट बंद करण्यात आल्याने आजूबाजूच्या परिसरातील लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागले होते. माथ्यावर असलेल्यां नागरिकांची तर शेती खाली असल्याने आणि दैनंदिन व्यवहारही चिपळूणच्या बाजारपेठेशी असल्याने सहाजिकच घाट बंद कालावधीत त्यांना घरातच अडकून रहाव लागत होतं. शिवाय शाळांनाही सुट्टी दिल्याने तसंच घाटाच्या वरील बाजूस लोटे एमआयडीसी असल्यामुळे चिपळूणमधून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांनाही अडचणींना समोर जावं लागलं होतं. त्यामुळे यावेळी मात्र घाट बंद करण्यास परशुराम ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणासाठी गेले वर्षभर काम सुरु आहे. यापूर्वी घाटात डोंगर कापताना अपघात घडल्याने घाटातील वाहतूक महिनाभर बंद ठेवून काम करण्यात आलं होतं. चौपदरीकरणाच्या कामाच्या दृष्टीने २५ एप्रिल २०२२ ते २५ मे २०२२ या कालावधीत हा घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली होती. त्यामुळे अवजड वाहतूक बंद ठेवून ती कळंबस्ते, आंबडस, चिरणीमार्गे लोटेकडे वळवण्यात आली होती.