मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट चौपदरीकरणाच्या कामासाठी घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याचा विचार सुरु आहे. प्रशासन लवकरच याबाबत निर्णय घेईल, अशी शक्यता आहे. परंतु परशुराम घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. घाट पुन्हा बंद झाल्यास विद्यार्थी, शेतकरी, नोकरदारांनी काय करायचं, असा सवालही विचारला जात आहे.

 पावसाळ्यात परशुराम घाट बंद करण्यात आल्याने मोठ्या समस्यांना समोरं जावं लागलं होतं. माथ्यावर असलेल्या नागरिकांचा दैनंदिन व्यवहारही चिपळूणच्या बाजारपेठेशी असल्याने सहाजिकच घाट बंद कालावधीत त्यांना घरातच अडकून पडावं लागत होतं. त्यामुळे यावेळी मात्र घाट बंद करण्यास परशुराम ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. परशुराम घाटातील चौपदरीकरणासाठी गेले वर्षभर काम सुरु आहे. यापूर्वी घाटात डोंगर कापताना अपघात घडल्याने घाटातील वाहतूक महिनाभर बंद ठेवून काम करण्यात आलं होतं. चौपदरीकरणाच्या कामाच्या दृष्टीने 25  एप्रिल 2022 ते 25  मे 2022 या कालावधीत हा घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली होती. त्यानंतर पावसाळ्यात पोखरलेले डोंगर खचल्याने अतिवृष्टीत घाट महिनाभर बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे अवजड वाहतूक बंद ठेवून ती कळंबस्ते, आंबडस, चिरणीमार्गे लोटेकडे वळवण्यात आली होती. आता घाटातील डोंगर कटाई आणि चौपदरीकरणासाठी भरावाचं काम पुन्हा सुरु केलं जाणार आहे. त्यासाठी पुन्हा महामार्ग बंद करण्यात येणार आहे. याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.