रत्नागिरी : राज्यातील 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या विशेष मोहिमेत महिलांना तपासणीसाठी याकरिता, औषधांसाठी प्रतिजिल्हा दोन कोटी रुपये निधी देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठीही दोन कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात नवरात्री उत्सवापासून 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या अभियानास सुरुवात झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग हे अभियान राबविले जात आहे. या अभियानास जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या मोहिमेत राज्यातील अंदाजे ४ कोटी महिलांची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात येणार आहे. यामध्ये १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम दि. १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे. लाभार्थ्यांना तपासणीसाठी शिबिराच्या ठिकाणी आणणे व घरी पोहोचविणे यासाठी वाहतूक व्यवस्था केल्यास अभियान अधिक प्रभावीपणे राबविता येईल, हे लक्षात घेऊन वाहतुकीसाठी निधीची तरतूद करण्याचे ठरले.
स्थानिक स्तरावर औषधे उपलब्ध करून देण्याची वेगळ्या निधीची तरतूद नसल्याने हा निधी देखील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना उपलब्ध करून देण्याचे ठरले.त्यानुसार ग्रामीण भागासाठी वाहतूक, औषधांकरिता मिळून १ कोटी, शहरी, महापालिका क्षेत्रासाठी १ कोटी असे प्रत्येक • जिल्ह्यासाठी २ कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या मोहिमेदरम्यान वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत १८ वर्षावरील महिला, नवविवाहीत महिला, गरोदर माता यांची तपासणी, औषधोपचार, सोनोग्राफी, समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जास्तीत जास्त तज्ज्ञ तपासणीसाठी उपलब्ध होतील. यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या मोहिमेला नवरात्री उत्सवापासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ४ लाख ३८ हजार ७५० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सुरुवातीला या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र गेले काही दिवस शेतीची कामे सुरू असल्याने ग्रामीण भागात ही मोहीम कासवगतीने सुरू आहेत.