राजापूर : गेल्या काही वर्षामध्ये अवकाळी पाऊस, बदलते प्रतिकूल वातावरण तर कधी किडीची प्रादुर्भाव आदी विविध कारणांमुळे कोकणचा राजा हापूस आंबासह काजू पिक आर्थिकदृष्ट्या धोक्यात आले आहे. त्यामध्ये गतवर्षीपासून फळमाशीच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या नुकसानीची भर पडली आहे. त्यातून बागायतदार चिंताक्रांत असताना आंबा व काजू पिकाला नुकसानीच्या खाईत लोटणाऱ्या विविध कीड व रोगांचे सर्व्हेक्षण करून त्यावर मात कशी करावी, या संबंधित शेतकऱ्यांना सल्ला देणारा शासनातर्फे 'हॉर्टसॅप प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाची तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी अनिल गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी केली जात असून, त्यासाठी तालुका कृषी विभागातर्फे सुमारे ७७ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणांची निवड करताना ज्या भागामध्ये काजू फळपिकाचे क्षेत्र जास्त त्या भागामध्ये काजू पिकासाठी तर ज्या भागात आंबा फळपिकाचे क्षेत्र जास्त त्या भागामध्ये आंबा पिकासाठी प्लॉटची निवड करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. निवड केलेल्या प्लॉटमध्ये आंबा पिकाची ३५ तर, काजू पिकाच्या ४२ ठिकाणांचा समावेश आहे.