शिरुर: शिरुर तालुक्यातून पन्नास वर्षापासून जुन्नर तालुक्यात जाण्यासाठी पंचतळे -भागडी हा चालू वहीवाटीचा शिव रस्ता एका शेतकऱ्याने दिडमहीन्यापुर्वी अडवला होता. सदरचा रस्ता अडवल्यामुळे नागरीकांची दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली होती. तो रस्ता खुला करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते माऊली ढोमे व सहकाऱ्यांनी जुन्नर व शिरुर तहसिल कार्यालयाकडे हा रस्ता खुला करण्यासाठी लेखी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता.  

शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले व त्यांच्या पथकाने तसेच टाकळी हाजी मंडल अधिकारी एकनाथ ढाके, पिंपरखेड तलाठी अमोल थिगळे, जुन्नरच्या निमगाव सावाचे मंडल आधिकारी नितीन चौरे, पिंपरी कावळच्या तलाठी स्वाती जाधव यांच्या टिमने अतिक्रमण बाजूला करत तात्काळ नागरीकांसाठी रस्ता खुला केला आहे.

हा रस्ता खुला केल्यामुळे शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने शिरुरचे तहसिलदार प्रशांत पिसाळ, नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी, शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक सुनिल ऊगले यांचा नागरी सन्मान करण्यात आला आहे.