लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नियोजित उड्डाण पुलाच्या कामामुळे नळपाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन सातत्याने फुटत आहे. पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने उड्डाण पुलाचे सुरू असलेले काम नगरपंचायतीने थांबवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
उड्डाण पुलाच्या कामाला खूपच उशीर होत आहे. जीर्ण झालेली जुनी जलवाहिनी नगरपंचायतीने तात्काळ बदलून टाकावी, अशी मागणी लांजा व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. महामार्ग चौपदरीकरणांतर्गत शहरातील उड्डाण पुलाचे काम अनेक कारणांमुळे रखडले आहे. शहराला नळपाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा देखील याला अडथळा होत आहे.
राष्ट्रीय महार्गाच्या दोन्ही बाजुसह मध्यभागातून मुख्य जलवाहिनी गेलेली आहे. उड्डाण पुलाच्या कामासाठी पिलर उभारताना ती अडचणीची ठरत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने नगरपंचायतीला पत्र पाठवून जलवाहिनी नव्याने जोडून घ्यावी, असे कळविले होते. नगर पंचायतीकडून याबाबत कोणताही पाठपुरावा केला जात नसल्याने जलवाहिनी बदलण्याचे काम ठप्प आहे. नगर पंचायतीच्या दुर्लक्षामुळे पिलर उभारणीचे काम ठप्प झाले आहे.
तत्कालीन ग्राम पंचायतीच्या मालकीची शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी सन १९७२च्या दरम्यान जमिनीतून वाडी-वस्त्यांकडे नेण्यात आली आहे. उड्डाण पुलाचे फाऊंडेशन, रस्ता बांधकामातील खोदाई यामुळे बसणाऱ्या हादऱ्याने जलवाहिनी सातत्याने नादुरूस्त होत आहे. पाणीपुरवठा सतत विस्कळीत होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. चौपदरीकरणाचे थांबविण्यासाठी नगर पंचायतीकडून प्रशासकीय कार्यवाही केली जात असल्यामुळे सध्या हे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. महामार्ग कामातील सिमेंट फाऊंडेशन झाल्यानंतर खोदाई करता येणे शक्य नाही. नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाने जुनी जलवाहिनी बदलणे अथवा दुरूस्ती करणे अधिक त्रासाचे ठरत आहे. सन २०१८ पासून नगरपंचायत स्तरावर कार्यवाही न झाल्याने अनेक कामे ठप्प होत आहे. संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सव्र्हस रोडचे काम अद्यापही अपूर्ण आहे. खोदाईमुळे मुख्य रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा बसलेल्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना याचा तोटा सहन करावा लागत आहे. नगरपंचायतीने त्वरित कार्यवाही न केल्यास व्यापारी संघटना, सर्व स्तरातील नागरिक सनदशीर मार्गाने योग्य ती भूमिका लवकरच घेणार आहेत. मुख्य मागण्या नगर पंचायतीने मान्य कराव्यात हीच अपेक्षा असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी दिली.