स्मशानभुमीच्या जागेवरुन चांडगावात वाद 

 

 वैजापूर 

 

 

स्मशानभुमीच्या जागेवरुन वैजापूर तालुक्यातील चांडगाव येथे गावकऱ्यांमध्ये फुट पडली आहे.‌ गट क्रमांक एकमधील ४० गुंठे एव्हढी जागा ही स्मशानभुमीची असल्याचा दावा एका गटाने केला आहे तर दुसऱ्या बाजुने गट क्रमांक एक शेजारी असलेल्या दोन मधील अर्चना ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सदर जागा ही आपल्या मालकीची असल्याचा दावा करत ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येत असलेले सुशोभीकरणाचे काम बंद पाडले. या जागेचे सर्व कायदेशीर अभिलेखे आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. अखेर पोलिस बंदोबस्तात ग्रामसेवक, तलाठी यांच्या उपस्थितीत भुमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने जागेची मोजणी करण्यात येत असुन सीमांकन निश्चित करण्यात येणार आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि वैजापूर तालुक्यातील चांडगाव येथे गट क्रमांक एक हा शासकिय गट असुन उर्वरित जागा गावठाण अर्थात ग्रामपंचायतीची आहे. मात्र गट क्रमांक एक मधील आठ एकर ३३ गुंठे क्षेत्रात स्मशानभुमी असुन यातील तीन एकर ३३ गुंठे क्षेत्राच्या सातबारा उताऱ्यात सार्वजनिक दफन स्मशानभुमीसाठी इतर अधिकारात नोंद आहे. सद्यसथितीत तेथे दफनविधी अंत्यसंस्कार केले जातात. ग्रामपंचायतीने २२ऑगस्टच्या एका ठरावात स्मशानभुमीत सुशोभीकरण करण्याचे निश्चित केले आहे पण हे काम चार एकर क्षेत्रात असलेल्या स्मशानभुमीत करायचे असुन चाळीस गुंठे क्षेत्रात करण्याचा ठरावात उल्लेख नसतानाही या ठिकाणी काम करण्यासाठी मशिनरी व मनुष्यबळाचा वापर केला जात असल्याने हे काम बंद करुन सदर जागा ही आपल्या मालकीचा असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे अर्चना गायकवाड विरुद्ध समस्त गावकरी असा संघर्ष स्मशानभुमीच्या जागेवरुन पेटला आहे.‌ ग्रामसेवक आसाराम बोबडे, तलाठी जया लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस हवालदार किसन गवळी, पोलीस अंमलदार प्रल्हाद जटाळे, महिला पोलीस अंमलदार रेणुका सुरवसे यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात गट क्रमांक एकच्या मोजणीस सुरुवात झाली. यावेळी पोलिस पाटलांसह गावकरी उपस्थित होते.