बीड: बहीण-भावाच नात फार निर्मळ अस नात असत. प्रत्येकाच्या आयुष्यात एक ताई असावी किंवा मोठ्या भावाकडे हट्ट करणारी चिमुकली बहीण हवी, असं म्हटलं जातं. बहीण-भावाच्या प्रेमाच्या अनेक कथा आहेत. ताई म्हणजे मायेचा सागर असतो. बहिणीचं प्रेमही आईसारखंच असतं. पण काही जणांना ते प्रेम कळत नाही. त्यातूनच ते आपल्या बहिणीचा तिरस्कार करतात आणि त्या तिरस्कारातून नको ते भयानक आणि विचित्र काहीतरी करुन बसतात. बीड जिल्ह्यातील परळीत तशीच काहीशी घटना समोर आली आहे.
बीडमध्ये एका 27 वर्षीय तरुणाने आपल्या सख्या भाच्याची फार शुल्लक कारणासाठी हत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपी मामाचा भाचा हा अवघ्या चार वर्षांचा होता. त्याची काहीच चूक नव्हती. पण तरीही आरोपी मामाने आपल्या सख्या भाच्याची हत्या केली. आरोपी नराधमाचं मन इतकं निष्ठूर कसं झालं की त्याने अवघ्या चार वर्षाच्या लेकराची हत्या केली? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
बहिणीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार वर्षीय भाच्याचा मामाने खून केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील नागापूर येथे उघडकीस आली. कार्तिक विकास करंजकर असे मृत बालकाचे नाव आहे. तो आई सुरेखा सोबत आजोळी मामाकडे गेला होता.
आईचे व मामाचे भांडण झाले. याच भांडणाचा राग मनात धरून शहानिक लक्ष्मण चिमणकर याने कार्तिकच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्याला उपचारार्थ सरकारी दवाखान्यात पाठविले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम मामाला काही तासात पोलिसांनी अटक केली.