संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, पण बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरले पण गद्दारी केली नाही. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आले, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. शिवसेनेचे बुलंद तोफ अशी ओळख असलेले खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. तब्बल १०० दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरले पण त्यांनी गद्दारी केली नाही. ते पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आले आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकारविरोधात बोलले की दबावतंत्र वापरले जाते. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते एचएमव्ही बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे.

संजय राऊत तब्बल १०० दिवसांनी जामीन मिळाला आहे. पीएमएलए विशेष कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला असून स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडी संजय राऊतांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील करणार आहे.