मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षणाला सुरुवात झाली आहे. या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी केले आहे.
दिव्यांग, तृतीयपंथीकरिता वय, पत्ता याबद्दल येत असलेल्या अडचणी लक्षात घेता आवश्यक दस्तऐवजाबाबत निवडणूक आयोगाद्वारे विशेष सवलत देण्यात आली आहे. नाव नोंदणीची सुविधा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहे.
रायगड जिल्ह्यात सदर संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत 19 (शनिवार) व 20 (रविवार) नोव्हेंबर, 2022 आणि 03 (शनिवार) व 04 (रविवार) डिसेंबर, 2022 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संक्षिप्त पुनरीक्षण काळात विद्यार्थी, दिव्यांग महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती, तृतीयपंथी या लक्षित घटकांसाठीची विशेष शिबिरे दि. १२ व १३ नोव्हेंबर २०२२ आणि दि. २६ व २७ नोव्हेंबर २०२२ यांच्यासाठी सुद्धा विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
सबब संबंधित विशेष मोहिम अंतर्गत 18-19 वयोगटातील मतदार, तृतीय पंथीय, देह व्यवसाय करणा-या स्त्रिया आणि दिव्यांग मतदार यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे. याकरिता आपण आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जाऊन मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 चे अर्ज भरुन दयावे किंवा एनएसव्हीपी, व्हीएचए व व्हीपोर्टल या पोर्टलवर लॉगीन करुन आपले नांव समाविष्ट करण्याबाबत ऑनलाईन अर्ज सादर करावे.
दिव्यांगांसाठी विशेष पीडब्ल्यूडी ॲप-
निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी विशेष पीडब्ल्यूडी या ॲपची सोय केलेली आहे. त्यावरून दिव्यांग मतदारांना नाव नोंदणी करता येईल. ज्यांचे आधीच नाव नोंदणी झालेली आहे, पण दिव्यांग म्हणून नोंद नसेल त्यांना या ॲपवरूनच दिव्यांगत्व चिन्हांकित करण्याची सोय आहे. दिव्यांगत्व चिन्हांकित झाल्यानंतर या मतदारांना मतदानाच्या वेळी पोस्टल मतपत्रिका, चाकाची खुर्ची, वाहन, आदी सुविधा पुरविणे निवडणूक कार्यालयासाठी सोयीचे ठरते.
तृतीयपंथींना दस्तऐवजात सवलत-
मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी वयाचा आणि निवासाचा दाखला आवश्यक असतो. मात्र, तृतीयपंथी, देह व्यवसायात असणाऱ्या महिलांना या दस्तावेज सादर करणे कठीण जाते. यासाठी राज्य मुख्य निवडणूक विभागाने विशेष सोय केली आली आहे. त्यांना मतदार यादीत नाव नोंदणी करताना वय आणि निवासाचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही. तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया यासारख्या वंचित घटकांनी ते जिथे राहतात तो पत्ता अर्जात नमूद करून अर्ज दाखल करणे महत्त्वाचे आहे. नाव पत्त्यात बदल करण्यासाठी अर्ज क्रमांक ८ भरून त्यांचे आधीचे नाव, लिंग यामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा आहे.
सोशल मीडियाचा वापर-
रायगड जिल्ह्यातील पात्र प्रत्येक व्यक्तीला मताधिकार बजाविता यावा यासाठी रायगड जिल्हा अधिकारी द्वारे मतदार नोंदणी जनजागृतीसाठी आवाहन करणारी सोशल मीडियावरून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या पेजवरून रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्हिडिओद्वारे मतदार नोंदणीसाठी आवाहन करीत आहेत.
"मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, नविन नोंदणी तसेच मतदार यादतील नोंदणीस आधार क्रमांक जोडणी इत्यादी प्रक्रीया गावातील नागरीकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्या याकरिता 10 नोव्हेंबर, 2022 (गुरुवार) रोजी रायगड जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये विशेष ग्रामसेभेचे आयोजन करण्यात येणार असून 09 नोव्हेंबर, 2022 (बुधवार) रोजी प्रसिध्द करण्यांत आलेल्या प्रारुप मतदार यादीचे वाचन सदर विशेष ग्राम सभेत होणार आहे. त्यानुसार मतदान यादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांच्या नावामध्ये दुरुस्ती, रहिवाशाचे स्थालांतरण विधानसभा अंतर्गत / बाहेरिल, मतदार ओळखपत्र बदलून देणे, दिव्यांग म्हणून चिन्हांकीत करावयाचे असल्यास नमुना 8 तसेच आपले मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडणी करण्याकरिता नमुना 6-ब भरुन संबंधीत आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा एनएसव्हीपी, व्हीएचए व व्हीपोर्टल या पोर्टलवर लॉगीन करुन संबंधीत अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करुन विशेष मोहिम / विशेष ग्राम सभेचा लाभ घ्यावा असे आवाहनरायगड जिल्हा अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.