परभणी(प्रतिनिधी)गाव विकासाबरोबर सरपंच आणि ग्रामसेवक मंडळींनी गावातील नागरिकांना प्रगत शेती, शैक्षणिक गुणवत्ता, पर्यटनस्थळ निमिर्ती, आरोग्य, पशुपालन, फळबाग लागवड सारख्या इतर अत्याधुनिक सुविधा कशा पुरवाव्यात अशा विविध विषयावर आधारित जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांचा जिल्हास्तरीय संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला.
मंगळवारी (दि.८) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांच्या जिल्हास्तरीय संवाद मेळाव्याचे आयोजन परभणीतील माहेर मंगलकार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी सरपंच - ग्रामसेवक यांच्यासह सर्व पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी रश्मी खांडेकर यांनी उपस्थित सरपंच - ग्रामसेवकांशी दिलखुलास संवाद साधला.
पुढे बोलताना श्रीमती खांडेकर म्हणाल्या कि, सरपंच आणि ग्रामसेवक मंडळींनी गाव विकास करत असतांना पर्यावरण संवर्धन, शेळी पालन, पशु पालना बरोबर पर्यटनस्थळांची निर्मिती करून नागरिकांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच पाण्याची सरोवरे, जुन्या हेमाडपंथी ऐतिहासिक ठिकाणाचा विकास करून त्या ठिकाणी पर्यटन स्थळ तयार झाल्यास नागरिकांना रोजगार निर्माण होईल. तसेच हुर्डापार्टी - रानमेवा सारखे पर्यायी व्यवसाय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करावेत.
थोडेसे मायबापासाठी पण उपक्रमांतर्गत गावातील जेष्ठ नागरिकांसाठी प्राथमिक सुविधा गावस्तरावर निर्माण करण्या बाबत सूचित केले. त्याच बरोबर शासकीय निधी आणि लोकसहभागातून ग्रामपंचायत स्तरावर सभा, बैठका, मेळावे अशा विविध कार्यक्रमांसाठी सभागृह बांधण्यासाठी प्रयत्न करावेत. शासनाच्या नरेगा योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड आणि वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन यावेळी सीईओ रश्मी खांडेकर यांनी केले.
यावेळी सीईओ रश्मी खांडेकर यांनी उपस्थित सरपंच मंडळींना बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून मनोगत व्यक्त करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील निवड ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आपल्या गावात निर्माण केलेल्या सोई - सुविधांची माहिती आपल्या मनोगता मधून दिली.
जिल्हास्तरीय संवाद मेळाव्याचे आयोजन पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी डॉ. संदीप घोन्सीकर, स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले होते. या मेळाव्याचे नियोजन विस्तार अधिकारी पंचायत जिल्हा परिषद / सहाय्यक गट विकास अधिकारी संतोबा चिलगर यांनी केले. सूत्रसंचालन पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी मधुकर उमरीकर यांनी केले.