खेड :मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यांचे काम पूर्णत्वास जात आहे. बोगद्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून, केवळ काँक्रीट रस्त्याचे काम बाकी आहे. एकूण ९ किलोमीटरच्या लांबीत २ किलोमीटरचे समांतर दोन बोगदे आहेत. सध्या या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्णत्वास गेले असून मार्च अखेरपर्यंत एक बोगदा वाहतुकीस सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आले आहे.

      

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात ‘ब्लॅक स्पॉट’ ठरलेल्या वळणावर अपघात होतात. पावसाळ्यात दरडी कोसळून महामार्ग बंद राहतो. घाटाच्या चढ आणि उतारात कार चालकांचा तासाभराचा कालावधी जातो. यावर उपाय म्हणून कशेडीत बोगदा करण्याचे ठरले. त्यानुसार ऑक्टोबर २०१९ मध्ये बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना परिस्थितीमुळे मनुष्यबळ न मिळाल्याने कामाला गती मिळाली नाही. दरम्यान कशेडी बोगद्याचे आतील बहुतांशी काम झाले असून केवळ रस्त्याचे काम बाकी आहे. त्यामुळे मार्च अखेरीस कशेडीतील एक बोगदा खुला करण्यावर भर देण्यात आला आहे. पुढील चार महिन्यात उर्वरित काम पूर्ण करून वाहतुकीस खुला केला जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.