शिरुर: शिरुर तालुक्यातील काही तलाठी यांच्या शासकीय कामकाजाबाबत चुकीची कामे करत असल्याचे निदर्शनास आल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेत संबंधित तलाठी यांचे दप्तर तपासनी करण्याचे आदेश देत दप्तर तपासणीसाठी एक स्वतंत्र पथक तयार करुन पथक प्रमुख म्हणून तहसीलदार अजित पाटील व नायब तहसीलदार प्रविण ढमाले यांची नेमणूक करुन त्यांच्या पथकामध्ये सहा महसूल कर्मचारी यांची नियुक्ती केली असुन एकूण आठ जणांचे पथक शिरुर तालुक्यातील तलाठी यांचे दप्तर तपासणी करत आहे.

यामध्ये शासकीय दप्तरामध्ये खाडाखोड करणे तसेच काही तलाठी यांनी एक व दोन गुंठयाच्या नोंदी बेकायदेशीरपणे केलेल्या असुन साठे खतावरुन सातबारा तयार केलेले आहेत. तसेच शासनाचा महसूल बुडवला असुन साठे खतालाच खरेदी खत असा उल्लेख करत फेरफार धरला आहे आणि शासनाची फसवणूक केली आहे .तसेच तलाठी कार्यालयामध्ये खाजगी व्यक्तीची नेमणूक करुन त्याच्याकडून तलाठी शासकीय कामकाज करुन घेत आहेत. तलाठी कार्यालयात ज्या खाजगी व्यक्तीची नेमणूक केली आहे. त्यांची नियुक्ती तलाठी यांनी कोणाच्या परवानगीने केली आहे हा प्रश्न विचारला जात आहे. 

तसेच या नेमणूक केलेल्या खाजगी व्यक्ती मार्फत तलाठी आर्थिक लूट करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा असून याचीही चौकशी व्हावी. तसेच तलाठ्यानीं गौण खनिज वाहतूक व उत्खनन यांच्यावर हेतूपुरस्सर कारवाई न करणे, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल तलाठी यांनी बुडविला आहे. 

अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी दाखल केली आहे. जिल्हाधिकारी यांनी तयार केलेल्या एका स्वतंत्र पथकामार्फत शिरुर तालुक्यात तलाठ्यांची दप्तर तपासणी सुरु झाली असुन दप्तर तपासणी सुरु झाल्यामुळे, शिरुर तालुक्यातील तलाठ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत पथक प्रमुख तहसिलदार अजित पाटील यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी तलाठ्यांच्या दप्तरामध्ये गंभीर दोष असल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत असुन तपासणी अहवाल जिल्हाधिकारी पुणे यांना सादर केल्यानंतर योग्य निर्णय जिल्हाधिकारी घेतील अशी माहिती दिली. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, संबंधित तलाठ्यां विरुद्ध काय कारवाई करणार याकडे शिरुर तालुक्यासह पुणे जिल्हयातील महसूल विभागाचे लक्ष लागले आहे.सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी यापुर्वी ही अनेकवेळा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी, उपोषण आणि आंदोलन करुन अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित केले आहे. काही अधिकाऱ्यांची आजही खातेनिहाय चौकशी सुरु आहे.

(क्रमश...)