शिरुर: शिरुर तालुक्यासह संपुर्ण पुणे जिल्ह्याच लक्ष लागलेल्या आणि शिरुर तालुक्यातील महत्वाची सहकारी संस्था असलेल्या रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. गेली 25 वर्ष असलेली सत्ता अबाधित ठेवण्यात कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांना पुन्हा एकदा यश आलं असुन अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी पॅनेलचे 20 तर शेतकरी सभासद पुरस्कृत घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे दादा पाटील फराटे हे एकमेव उमेदवार निवडून आल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.
सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास न्हावरे फाटा येथील कानिफनाथ मंगल कार्यालय येथे मतमोजणीस सुरवात झाली. पहिल्यांदा मांडवगण फराटा, वडगाव रासाई, इनामगाव या गटातील मतमोजणी करण्यात आली. यात शेतकरी पॅनलचे विद्यमान अध्यक्ष अशोक पवार, उमेश साठे, नरेंद्र माने, सचिन मचाले,संभाजी फराटे तर घोडगंगा किसान क्रांती पॅनलच्या दादा पाटील फराटे यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली होती तर दुसऱ्या फेरीत सर्व उमेदवारांची आघाडी कायम राहिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शिरुरचे आमदार अशोक पवार यांच्यावर पुन्हा एकदा मतदारांनी विश्वास दाखवला असुन आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषीराज पवार हे दुर्बल घटकातून बिनविरोध निवडून आले होते.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी पॅनेल व भाजप पुरस्कृत घोडगंगा किसान क्रांती पॅनल या दोन पॅनल मध्ये अटीतटीची लढत झाली. "मताला नाही पण उसाला तीन हजार रुपये भाव देणारच" हे ब्रीदवाक्य घेऊन घोडगंगा किसान क्रांती पॅनलने अशोक पवार यांच्यामुळेच कारखान्यावर 450 कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा झाला असे गंभीर आरोप केले. शेतकरी पॅनलचे आमदार अशोक पवार यांनी विरोधकांनी केलेले आरोप सिद्ध केले तर राजकारण सोडुन देईल आणि आरोप सिद्ध नाही झाले तर विरोधकांनी राजकारण सोडण्याची तयारी दाखवावी असे प्रत्युत्तर दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांची तर भाजपच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मांडवगण येथे सभा झाल्याने या निवडणुकित खरी रंगत आली होती.
यावेळी विजयाबद्दल बोलताना आमदार अशोक पवार यांनी हा विजय माझा एकट्याचा नसून सर्वसामान्य सभासदांचा असून निवडणूक काळात विरोधकांनी खालच्या पातळीवर टीका केल्याने मतदारांनी त्यांना नाकारले असे सांगितले. घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात पिता पुत्रांची दमदार एंट्री झाल्याने एकाच सभागृहात पिता-पुत्र एकत्र काम करताना दिसणार आहेत. रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पिता-पुत्रांना एकाच वेळी संचालकदी विराजमान होण्याचा बहुमान मिळणार आहे.रावसाहेब पवार व अशोक पवार यांच्यानंतर ऋषीराज पवार ही तिसरी पिढी राजकारणात प्रवेश करत आहे. मतमोजणीच्या वेळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीप्रमाणे :
गट क्रमांक 1-मांडवगण फराटा
संभाजी शिवाजी फराटे (7180),
दादासाहेब गणपत फराटे (6938)
गट क्रमांक-2 इनामगाव
सचिन बाबासाहेब मचाले (7768),
नरेंद्र आण्णासो माने (7452)
गट क्रमांक -3 वडगाव रासाई
अशोक रावसाहेब पवार (8172),
उमेश सुदाम साठे (7409),
गट क्रमांक -4 न्हावरे
संजय ज्ञानदेव काळे (7826),
शरद मोहनराव निंबाळकर (7732),
मानसिंग सीताराम कोरेकर (7639)
गट क्रमांक 5- तळेगाव ढमढेरे
सोपान वाल्मिकराव गवारी (7686),
विश्वास रामकृष्ण ढमढेरे (7362),
पोपट रामदास भुजबळ (7136)
गट क्रमांक 6 - शिरूर
वाल्मिक धोंडिबा कुरुंदळे (7619),
सुहास नारायण थोरात (7417),
प्रभाकर नारायण पाचुंदकर (6378)
महिला राखीव
मंगल सुहास कोंडे (7645),
वैशाली सुनील जगताप (7551)
अनुसूचित जाती जमाती
उत्तम रामचंद्र सोनवणे (7614)
इतर मागास प्रवर्ग
शिवाजी मुक्ताजी गदादे (7426)
भटक्या विमुक्त जाती जमाती
बिरा बाबू शेंडगे (7201)