आदमपूर: आपल्या वीस दिवसाच्या आजारी मुलीची आईनेच गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना अकोल्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. हत्येचे नेमकं कारण समोर आले नसून शवविच्छेदन अहवालावरुन हत्या झाल्याचे समोर आले आहे. तेल्हारा पोलिसांनी आई विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील वाडी आदमपूर येथील वय २० दिवसांच्या चमुकलीची ७ ऑक्टोबर २०२२ रोजी तब्येत खराब असल्याने तिला तिची आई लक्ष्मी भदे व तिचा मामा सौरव बरिंगे यांनी वैद्यकीय उपचारासाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करुन त्या बाळाला पुढील उपचारासाठी अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले.
रुग्णावाहिकेने या २० दिवसांच्या चिमुकलीला घेऊन तेल्हाऱ्यावरुन अकोला येथे नेले जात असता तिच्या आईनेच तिचा गळा आवळून तिला मारल्याचे शवविच्छेदन अहवालात समोरआले. दरम्यान याप्रकरणी आई लक्ष्मी भदे रा. रामतीर्थ ता. दर्यापूर जि. अमरावती हल्ली मुक्काम वाडी आदमपूर ता. तेल्हारा जि. अकोला हिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश धामोडे करीत आहेत.