सखाराम बोबडे पडेगावकर यांची मध्यस्थी यशस्वी
गंगाखेड प्रतिनिधी
स्वतःच्या शेतात लावलेल्या फळबागेचे मस्टर काढण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या कृषी सहाय्यक एडके यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी महिला शेतकऱ्यांने सोमवारी गंगाखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले .आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या मध्यस्थीने कृषी सहाय्यकाच्या बदलीचे लेखी आश्वासन घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
मरडसगाव येथील शेतकरी गयाबाई नारायण सरवदे यांनी आपल्या शेतामध्ये आंब्याची फळबाग लागवडीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी शेतामध्ये 300 झाडे लावली. या झाडाचे बिल काढण्यासाठी कृषी सहाय्यक एडके हे वेळोवेळी शेतकऱ्यांस मानसिक त्रास देत होते. पैशाचीही मागणी केली होती. 300 ऐवजी 400 झाडे लावल्याचे मी दाखवतो वरच्या शंभर झाडाचे पैसे मात्र मला द्यावे लागतील अशी अजब मागणी एडके यांनी शेतकऱ्याकडे केली होती. यावर शेतकऱ्यांने वेळोवेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे चकरा मारून बिल काढण्यासाठी विनंती केली. पण त्या शेतकऱ्यास कोणी दाद देत नव्हते. कंटाळलेल्या या महिला शेतकऱ्यांने आपले पती नारायणराव सरवदे, मुलगा आनंद सरवदे व मुलगी याच्या सह सोमवारी सकाळी गंगाखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणास प्रारंभ केला. या उपोषणास भेट देण्यासाठी व शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या यशस्वी मध्यस्थीने या महिला शेतकऱ्यांचे उपोषण मागे घेण्यात आले. तालुका कृषी अधिकारी बनसवडे यांच्याशी झालेल्या चर्चेतून संबंधित कृषी सहाय्यक एडके यांच्यावर मुख्यालय बदलीचा प्रस्ताव कृषी विभाग कार्यालय लातूर यांच्याकडे पाठवण्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकारी बनसोडे यांनी दिल्यानंतर ही उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणास सखाराम बोबडे पडेगावकर यांचे सह ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष जयवंत कुंडगीर, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे, आहिल्या प्रतिष्ठान मालेवाडीचे मुंजाभाऊ लांडे,तुकाराम पांचाळ, सुभाष गाढवे आधी आदींनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी पोळ यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.