सोलापूर: विवाहासाठी मुलगी दाखवण्याच्या बदल्यात कर्जत येथील मोरे कुटुंबियांना दीड लाख रुपयास फसवल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द MIDC पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार बाळासाहेब रमेश मोरे (रा. जळकेवाडी, ता. कर्जत. जि. नगर) याचा मोठा भाऊ बापूसाहेब यांच्यासाठी फिर्यादी व त्यांचे कुटुंबिय विवाहासाठी स्थळ शोधत होते. ३ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब मोरे याने निलेश विठ्ठल यादव यांना दत्तात्रेय दळवी यांच्याकडे स्थळ पाहण्यास सांगितले. दळवी यांनी 'तुम्ही वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष शामल चव्हाण (रा. गोरे वस्ती, वाघोली, पुणे) यांच्याकडे जावा' असा सल्ला दिला. त्यानुसार चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सोलापूर येथे मुलगी आहे, पण मुलगी बघण्यासाठी सोलापूरला यावे लागेल आणि लग्नासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले.

ठरल्याप्रमाणे बाळासाहेब मोरे याचे कुटुंब मुलगी पहायला टेंभुर्णी येथे आले. त्यानंतर मुबारक मोहम्मद मुल्ला (रा. जत) यांची ओळख करुन दिली. त्यांच्यासोबत धानम्मा नागनाथ बिराजदार ही महिला होती. त्या दोघांनी फिर्यादीच्या नातेवाईकांना जुने घरकुल येथील पत्र्याच्या घरात नेले. तेथे दोघांनी सुरेखा पुजारी नावाच्या मुलीचे स्थळ दाखवले. मुलीचे आई-वडील मयत झाल्याचे सांगितले. तसेच रात्र झाली असून विवाचा कार्यक्रम उद्या उरकू असे सांगितले. तोवर लग्नाचे पेपर तयार करु म्हणून सुरुवातीला १० हजार रुपये 'फोन पे'वर मागून घेतले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे त्यांनी सर्वांना जिल्हा परिषदेसमोर येण्यास सांगितले.

बॉण्ड लिहून घेताना मुल्ला यांनी धानम्मा बिराजदार यांच्या बँक खात्यात एक लाख १० हजार रुपये पाठवायला सांगितले. ठरल्याप्रमाणे ६० हजार रुपये धानम्माच्या खात्यात आणि निलेश यांनी रोख ५० हजार रुपये घेतले. तसेच शामल चव्हाणच्या खात्यावर १५ हजार पाठवले.

नियोजित प्लॅननुसार फसवणूक

धानम्मा बिराजदार हिने माझ्या अकाउंट वर पैसे आले नाहीत म्हणून तिथून पळ काढून निघून गेली. त्यानंतर मुल्ला व शामल चव्हाण या दोघांनी 'तुम्ही मुलीला व तिची बहीण महानंदा यांना घेऊन पुणे नाका या, तेथील मंदिरात विवाह लावू, लग्न झाल्यावर तुम्ही मुलीला घेऊन जावा' असे सांगितले. त्यावेळी विवाहाच्या ठिकाणी गेल्यावर काही अनोळखी लोक आले आणि गोंधळ करुन वधू व तिची बहीण पळून गेल्या.

मुल्ला यांनी त्या मुलाच्या कुटुंबियांना पण पळून जाण्याचा सल्ला. काही वेळाने सर्वांचेच मोबाइल बंद लागले. फसवणूक झाल्याची बाब मोरे कुटुंबियांच्या लक्षात आली आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार महंमद मुल्ला, धानम्मा बिराजदार, शामल चव्हाण, सुरेखा चव्हाण, सुरेखा पुजारी व महानंदा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. पोलिस तपास करीत आहेत.