रत्नागिरी : मुंबईसह राज्यभरात पोलीस उपायुक्त दर्जाच्या १०९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी गृहविभागाने जाहीर केली आहे. तर गेल्या महिन्यात २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून महिन्याभरात एकूण १३४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत रत्नागिरी जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची बदली करण्यात आली आहे. दोन वर्ष रत्नागिरीत कार्यरत असलेल्या अप्पर अधीक्षक देसाई यांना कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रत्नागिरीत कोल्हापूरातील अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना नियुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान रत्नागिरीत अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून जयश्री देसाई यांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. नुकतेच जिल्ह्यात घडलेले सोने व्यापारी हत्या प्रकरणात त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी करून काही दिवसांत आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्ह्यात सायबर गुन्ह्याप्रकरणी जनजागृती करण्यात देखील अप्पर अधीक्षक देसाई यांचे मोलाचे योगदान आहे. 

नव्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी याअगोदर रत्नागिरी जिल्ह्यात चार वर्ष महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यावेळी गायकवाड यांच्याकडे पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार होता. यामध्ये लांजा व रत्नागिरी तालुक्यासाठी प्रत्येकी दोन वर्ष कार्यभार सांभाळला आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्याचा दांडगा अनुभव असेल यात शंका नाही.  मात्र आता पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात रत्नागिरी जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून जयश्री गायकवाड या कार्यभार स्वीकारनार आहेत.