रत्नागिरी: शाळेतील वर्ग खोल्यांचे संपूर्ण डिजिटलायजेशन करीत रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा आणि शिक्षण पायाभूत सुविधांच्या विकास कामांचे उद्घाटन दामले शाळा आणि गांधी उर्दू शाळा या ठिकाणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. कोटक महिंद्रा बँक आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट (एआयआयएलएसजी) यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक दायित्व श्रेणी अंतर्गत शाळांसाठी हा शैक्षणिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

या अंतर्गत जिल्ह्यातील ५ शाळांमधील १५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ होणार आहे. दामले विद्यालय, राष्ट्रपिता महात्मा गांधी शाळा, डॉ. अब्दुल कलाम आझाद विद्यालय, पटवर्धन विद्या मंदिर आणि गोळप शाळा शाळांना या सामाजिक दायित्व प्रकल्पाचा लाभ होणार असून या पाच शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये अत्याधुनिक डिजिटल शिक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

याबाबत कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष आर वर्धराजन, म्हणाले की, कोटक महिंद्रा बँक ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह वंचित समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज ओळखते. कोटक ही एआयआयएलएसजी सोबत रत्नागिरी जिल्ह्यातील पाच शाळांमधील सुमारे १,५०० विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आश्वासक शैक्षणिक वातावरण प्रदान करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. सामाजिक दायित्व प्रकल्पाचे उद्दिष्ट गळतीचे प्रमाण कमी करणे, धारणा दर वाढविणे आणि शाळांमधील अध्यापनाचे परिणाम सुधारणे हे आहे.

एआयआयएलएसजीचे उपमहासंचालक मुकेश कणसकर या वेळी म्हणाले की, आमची संस्था ही 'शिक्षण रंजन केंद्र' सारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे सर्वांगीण बालविकासासाठी काम करीत आहे. या प्रकल्पांतर्गत शिक्षकांना प्रयोगशाळेचा वापर वाढविण्यासाठी प्रशिक्षण देईल आणि मुलांना त्यांची मूलभूत शैक्षणिक कौशल्ये सुधारण्यात मदत करण्यासाठी शिक्षण रंजन केंद्रासह कौशल्य शिक्षणाला प्राधान्य देईल, असे कणसकर यांनी या वेळी सांगितले.