मुंबई: भाजपतर्फे 'जागर मुंबईचा' अभियान राबवण्यात येत आहे. भाजपच्या जागर मुंबईचा अभियानाअंतर्गत वांद्रे येथील बीकेसी मैदानावर भाजपने जाहीर सभा घेतली. या सभेत भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी त्यांचे वडिल प्रमोद महाजन यांच्या मृत्यूबाबात भाष्य केले. महाजन यांच्या मृत्यूच्या तब्बल 16 वर्षानंतर पूनम महाजन यांनी प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत.

माझ्या बापाला कुणी मारले हे मला माहित आहे. पण, या घटनेमागचा मास्टरमाइंड कोण होता? तुम्ही सत्तेत असताना याचा शोध का घेतला नाही? असा जाहीर सवाल महाजन यांनी या सभेत उपस्थित केला. मला माहिती आहे की माझ्या बापाला कोणी मारलं. त्याच्या मागचं मास्टरमाईंड कोण होतं ? तुमचं सरकार असताना माझे वडील गेले ? तेव्हा तुम्ही ते मास्टर माईंड शोधून दाखवला नाही असा गंभीर आरोप महाजन यांनी केला. 

16 वर्षापूर्वी झाली प्रमोद महाजन यांची हत्या

प्रमोद महाजनांचा मृत्यू होऊन 16 वर्ष झाली आहेत. 3 मे 2006 रोजी वरळी येथील 'पूर्णा' निवासस्थानी प्रमोद महाजन यांची हत्या झाली. प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रविण महाजन यांनीच घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर प्रविण महाजन यांना अटक झाली. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली.

पूनम महाजन यांनी तब्बल 16 वर्षानंतर आता या प्रकरणावर थेट जाहीर सभेत भाष्य केले आहे. या हत्येमागचा मास्टरमाईंड न शोधल्याचा आरोप पूनम महाजन यांनी केला आहे.

पूनम महाजन यांनी जाहीरपणे कोणत्या पक्षाचे अथवा व्यक्तीचे नाव घेतले नाही. यामुळे पूनम महाजन यांचा रोख नेमका कुमावर याबाबात राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, या सभेत पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर देखील सडकून टीका केली.