कोरेगाव: दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये सातारा जिल्ह्यात चौघे जण ठार तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहेत. या अपघातामध्ये माय-लेकरासह अन्य दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. लता नारायण चव्हाण, मुलगा निखिल नारायण चव्हाण (रा. वडाचे म्हसवे, ता. जावळी) आणि सुजित संतोष खरात आणि देवदत्त मोहन सपकाळ (रा. चिमणगाव, ता. कोरेगाव), अशी मृतांची नावे आहेत. नवनाथ राऊत हा गंभीररित्या जखमी झाला आहे.
आजारी आजीला भेटण्यापुर्वीच काळाचा घाला
आजारी आईला भेटण्यासाठी लता चव्हाण या मुलगा निखिल याच्यासोबत दुचाकीवरुन माहेरी कापशी बिबीला निघाल्या होत्या. त्यांच्या दुचाकीला समोरुन येणार्या ओमनी कारने भीषण धडक दिली. या अपघातात लता चव्हाण आणि निखिल या माय-लेकरांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वडाचे म्हसवे गावावर शोककळा पसरली. निखिल या तरुणाचा प्रगतशील शेतकरी म्हणून म्हसवे परिसरात नावलौकीक होता. या अपघाताची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली आहे.
ट्रॅक्टर ट्रॉली-कार अपघातात दोघांचा मृत्यू
पुसेगाव-कोरेगाव मार्गावर गोळेवाडी गावच्या हद्दीत ट्रॅक्टर ट्रॉली आणि कारचा रात्री भीषण अपघात होऊन कारमधील सुजित संतोष खरात, देवदत्त मोहन सपकाळ आणि नवनाथ राऊत हे तीन जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना सातारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना सुजित आणि देवदत्त या दोघांचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या नवनाथ याच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.