संगमेश्वर : महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत रुग्णवाहिकेतून महिलांना प्रसूतीसाठी नेताना वाहन चालकांना मातेसह बाळाचा प्रथम विचार करावा लागतो. एखादी गर्भवती महिला असेल तर जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. या खड्ड्यातून हेलकावे खात गाडी रत्नागिरी पर्यंत कशी न्यावी हा प्रश्नच असतो. मात्र अशाही परिस्थितीत संगमेश्वरातील एका अम्बुलन्स चालक आणि एका महिला डॉक्टरने गर्भवती महिलेची सुटका केली आहे. 

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील एका महिलेला प्रसूती कळा आल्यानंतर रत्नागिरी येथे हलवण्यात येत होते. खड्ड्यांच्या त्रासाने महिलेची रस्त्यातच प्रसूती करण्याची वेळ आली. 108 चे वाहन चालक काशिनाथ फेपडे यांनी प्रसंगावधान राखत निवळी घाटात गाडी उभी केली आणि डॉ. स्नेहल शेलार यांनी त्या मातेची सुखरूप सुटका केली. 

 रविवार 6 नोव्हेंबर रोजी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात ज्ञानेश्वरी घेवड़े या गर्भवती महिलेची अचानक तब्येत बिघडली. लगेचच संगमेश्वर रुग्णालयातून 108 रुग्णवाहिकेला रविवारी सकाळी 8 च्या सुमारास फोन करून बोलावण्यात आले. गर्भवती घेवडे याना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात हलविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. 108 रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर ड्रायव्हरला रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे नेण्यास सांगण्यात आले. त्यांच्यासोबत डॉ. स्नेहल शेलार होत्या. काही वेळातच रुग्णवाहिका संगमेश्वर येथून निघाली. महामार्गावरील खड्डे चुकवत चुकवत रुग्णवाहिका जात होती. यावेळी गर्भवतीला वेदना असह्य होऊ लागल्या. खड्डे चुकवताना गाडी आदळत होती. आपटत होती. त्यामुळे घेवडे याना अधिक त्रास जाणवू लागला. 

दरम्यान चालक काशिनाथ फेपडे यांनी महीलेला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन वाहन चालवत होते. मात्र खड्ड्यामध्ये रत्नागिरीत पोहोचण्यास वेळ लागणार होता. आंबेड बुद्रुक गाव सोडल्यानंतर महिलेला प्रसूतीच्या कळा जास्तच जाणवू लागल्या. त्यानंतर हळूहळू मानसकोंड गाव पार झाले. तरीही महिलेला धीर नातेवाईक तिला धीर देत होते. ती विव्हळत होती. रत्नागिरीला पोहोचण्यास अजून 1 तासाचा प्रवास होता. मानस कोंड नंतर वांद्री, तलेकांते, बावनदी जेमतेम पार झाली. ज्ञानेश्वरी घेवडे जास्तच विव्हळत होत्या. नातेवाईकांनी याची माहिती लगेच डॉ. स्नेहल शेलार याना सांगितली. शेलार याना कळले की आता रत्नागिरीत जाणे फार कठीण आहे. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाहन चालक काशिनाथ फेपडे याना निवळी घाटात अम्बुलन्स बाजूला लावण्यास सांगितली. फेपडे यांनी लगेचच गाडी एका बाजूला घेतली. रुग्णवाहिका थांबवून डॉ. स्नेहल शेलार यांनी गाडीतच प्रसुती करण्याचे ठरवले. त्यांनी गाडीचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर काही वेळातचं ज्ञानेश्वरी घेवड़े यांना कन्यारत्न झाले. दोघेही सुखरूप असल्याचे पाहिल्यानंतर डॉक्टरनी आनंद व्यक्त केला. वाहन चालक फेपडे याना याची कल्पना दिली. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी गाडी पुन्हा रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. बाळ आणि आईला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघेही सुखरूप आहेत. डॉ. स्नेहल शेलार आणि वाहन चालक फेपडे यांच्यामुळे एका महिलेची सुखरूप सुटका झाली. घेवडे यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि चालकाचे आभार मानले. या घटनेनंतर डॉ. शेलार आणि चालक फेपडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाचे कौतुक होत आहे. 

मात्र महामार्गावरील या खड्ड्यांमुळे गर्भवती महिलांना किती त्रास सहन करावा लागतोय हे लोक प्रतिनिधीना कधी दिसणार. जिल्ह्यात पाच आमदार असताना महामार्गाचे खड्ड्यांचे विघ्न मात्र काही केला संपत नाही. महामार्गावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. चौपदरी करणाचे काम अर्धवट आहेच. परंतु आहे तोच महामार्ग व्यवस्थित नाही आणि नवीन चौपदरीकरणाच्या वल्गना केल्या जाताहेत. जनता आता आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना जाब विचारणार आहे का? की लोक प्रतिनिधी जनतेला खड्ड्यात घालताहेत हे निमूटपणे सहन करणार आहे.