संगमेश्वर : तालुक्यातील देवरूख परशुराम वाडी येथे गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घराला आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये गरीब शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. घरातील भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी सामान जळून खाक झाले आहे. यामध्ये साडेसात लाखांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, देवरुखातील परशुराम वाडी येथे सीताबाई राघो परशुराम यांच्या घराला गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. परशुराम यांच्या कुटुंबात 10 जण आहेत. सारे कुटुंब घराशेजारील शेतात भात झोडणी करत होते. यावेळी आकाश हा आकाश परशुरामला घराकडे आग लागल्याचे दिसले. त्याने साऱ्यांना याची कल्पना दिली. परशुराम कुटुंब घराच्या दिशेने धावले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी , कडधान्याने पेट घेतला होता. घराचे वासे जळून कौले खाली कोसळली होती. घराला आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. परिसरातील ग्रामस्थ त्या दिशेने धावले. जमेल तसे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. राजू काकडे हेल्प अकॅडमीला याची माहिती मिळताच सारे त्या दिशेने रवाना झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र डोळ्यादेखत घर भस्मसात होताना पाहून परशुराम कुटुंब हताश होऊन पहात होते. टाहो फोडून आक्रोश करत होते. ऐन दिवाळीत घर भस्मसात झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. खायचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून सुमारे 7 लाख 70 हजारांचे नुकसान झाल्याचे समजते.
अनेक राजकीय पुढारी या ठिकाणी येऊन भेटी देऊन गेले. परशुराम कुटुंबाचं झालेलं नुकसान लक्षात घेता त्यांना मदतीची आवश्यकता आहे. नेत्यांनी नुसत्या भेटी न देता मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे.