केज :-
माजी आमदार प्रा. संगिताताई विजयप्रकाश ठोंबरे यांनी मस्साजोग शिवारात नविन उभारलेल्या सुभद्रा पेट्रोलीयम या पेट्रोल पंपावर अज्ञात चोरट्यानी टाकीतील डिझेल चोरून नेले आहे.
या बाबतची माहीती अशी की, केज बीड महामार्गावर केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा सौ संगीताताई ठोंबरे यांचा सुभद्रा पेट्रोलियम नावाचा पेट्रोल पंप सुरू होत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून त्यांचे लवकरच उदघाटन होणार आहे. त्यासाठी त्यांनी पेट्रोल व डिझेल खरेदी केले असून ते जमिनीतील टाक्यात भरून ठेवलेले आहे.
दरम्यान दि. ३० ऑक्टोबरच्या दुपारी २:०० ते २ नोव्हेंबरच्या दुपारी २:३० वा. च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ४ हजार लिटर डिझेल ज्याची किंमत ३ लाख ८० रुपयाचे डिझेल चोरून नेले.
या प्रकरणी माजी आ. प्रा. संगीताताई ठोंबरे यांचे यजमान आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे सुत गिरणीचे चेअरमन डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दि. ३ नोव्हेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं ५०७ /२२ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक त्रिंबक सोपने हे पुढील तपास करीत आहेत.