गंगाखेड शुगर्सचा १३ वा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम संपन्न
परभणी प्रतिनिधी
गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लिमिटेड चा सन २०२२-२३ चा १३ वा गळीत हंगाम शुभारंभ आज दि. ०३ / ११ / २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता कारखान्यास मागील वर्षीच्या गळीत हंगामात सर्वाधिक ऊस तोडणी व वाहतुक करणारे ठेकेदार श्री. माधव मुंजाजी पोले, श्री. धुराजी गंगाराम वाणी, श्री. धोंडीराम भवानबा वाणी, श्री. महेश लहुदास गुट्टे यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व खाते प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकुन पार पडला, तर सत्यनारायण पुजा कारखान्याचे जेष्ठ कर्मचारी श्री. दगडु त्रिंबक केंद्रे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अंजनाताई दगडु केंद्रे यांच्या हस्ते कारखाना स्थळी संपन्न झाला.
कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गळीत हंगामासाठी विहित वेळेत गाळपाची तयारी पुर्ण केल्याबद्दल सर्व विभागांचे अभिनंदन केले. तसेच गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये १० लाख मे. टनाचे उदिष्टये पुर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप होणाऱ्या ऊसास शासनाच्या नियमाप्रमाणे ( एफआरपी प्रमाणे) ऊसाला भाव दिला जाईल. तसेच गळीत हंगाम २०२२-२३ करिता कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पुरवठा करून सहकार्य करावे. तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या वर्षी अतिरिक्त पर्जन्यमान झाल्यामुळे ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात वाढणार आहे, तरी सुध्दा कार्यक्षेत्रातील ऊस शिल्लक राहणार नाही याची दक्षता कारखान्याकडून घेतली जाईल. तसेच ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार व कर्मचारी हे कारखान्याचे आधारस्तंभ असुन त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता व्यवस्थापनाकडुन घेतल्या जाईल असे आवर्जून सांगितले. या प्रसंगी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी श्री. लटपटे, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लि. च्या गळीत हंगाम २०२२-२३ करिता जास्तीत जास्त ऊस पुरवठा करुन १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उदिष्टये साध्य करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तसेच उपस्थितांचे आभार एच. आर मॅनेजर श्री. प्रदिप वेरुळकर यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी कारखाना परिसरातील शेतकरी, व्यापारी, तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.