#पात्र लाभार्थींना आनंद शिध्याचे वाटप लवकर व्हावे यासाठी रेशन दुकानदारांना अधिकाधिक वेळ रेशन दुकानात खर्ची घालावा लागला.

#पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी देखील ऐन दिवाळीत कर्तव्यावर थांबले.

# राज्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्हा आनंदाचा शिधा वाटपात पहिल्या दहामध्ये अग्रेसर आहे.

अलिबाग:-अमूलकुमार जैन

रायगड जिल्ह्यात सुमारे चार लाख ४८हजार७५ पात्र कुटुंबांसाठी चार लाख ४८हजार७५ म्हणजेच १७९२३०० पॅकेटस उपलब्ध होणे अपेक्षित होते. आतापर्यंत २६६२८९४ लाख पॅकेट्स प्राप्त झाले असून त्यापैकी १५२०४०३म्हणजे८४.८३ टक्के पॅकेटसचे वाटप पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी दिली आहे.

     अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी दिवाळी सणानिमित्त वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा पासून आजही हजारो पात्र लाभार्थी त्यापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये या किटचे दिवाळीच्या दोन ते तीन दिवस अगोदर सुरू झाले आहे.

वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली आहे. गॅस, जीवनावश्यक वस्तूंची वाढती भाववाढ यामुळे गोरगरीब मेटाकुटीला आले आहेत.

रोजचे जगणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत दिवाळीत तरी मुला-बाळांच्या मुखात दोन गोड घास घालावेत, यासाठी सर्व जण प्रयत्नशील असतात. त्यासाठी ते सदैव खटाटोप करत असतात. यंदा राज्य सरकारने गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी, याहेतूने त्यांना दिवाळीपूर्वी हा आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले. परंतू या शिधाचे वाटप दिवाळी पूर्वी होणे गरजेचे होते. आनंदाच्या शिधामध्ये रवा, साखर, चनाडाळ, पामतेल असे वाटप करण्यात आले.

महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अंत्योदय आणि प्राधान्यक्रम शिधापत्रिका बाळगणाऱ्या सामान्य कुटुंबांना ही दिवाळी गोड करता यावी, यासाठी त्यांना रेशन दुकानाच्या माध्यमातून चणाडाळ, साखर, रवा आणि तेल देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. दिवाळीसाठी रेशन दुकानांमधून प्रत्येकी एक किलो रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू पुरविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सुमारे चार लाख ४८हजार७५ कुटुंबे त्यासाठी पात्र असून,पंधरा तालुक्यांना हे किट पुरविण्यात आले. या तालुक्यांमध्ये या किटचे वाटपदेखील सुरू झाले आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत ९२.७८ टक्केच किट प्राप्त झाल्याने अद्याप काही कुटुंबापर्यंत हे किट पोहोचू शकलेले नाही.

 त्यामुळे पुरवठा विभागाची मोठी अडचण झाली आहे.उर्वरित पात्र कुटुंबांना या किटचा लाभ केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

आजपर्यंत सर्वात कमी म्हणजे केवळ ४२टक्के इतकाच आनंदाचा शिधा हा म्हसळा तालुक्यात वाटप करण्यात आला असून पेण तालुक्यात सर्वांधिक म्हणजे ९४.२५इतका आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले आहे.

  सुरवातीला आनंदाचा शिधा हा ऑनलाइन पध्दतीने घेण्यासाठी लोकांनी रेशन दुकानांबाहेर रांगा लावल्या. सर्व्हर वारंवार डाउन होणे, पॉस मशिनचा बायोमेट्रिकवर थंब नोंद न होणे यामुळे वितरणात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने शिधा वितरणाचे आदेश राज्य सरकारने पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन दुकानांना दिले.

  आजपर्यंत जिल्ह्यात आनंदाच्या शिध्याचे ८४.८३ टक्के इतकेच वाटप पूर्ण झाले आहे. पंधरा तालुक्यांत आनंदाच्या शिध्याचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

- मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी

तालुका वितरित करण्यात आलेले किट

---------------------------------------------------------------

 तालुका दुकानात वितरित शिधाधारकांना

                     केलेले किट वाटप केले किट

-----------------------------------------------------------------

१)पेण १६५४०८ १५५८९७

२)खालापूर १४३९७४ १४०१६४

३)उरण ९९७७६ ९७९७३

४) कर्जत १६४९०८ १५५४३२

५)पनवेल २५९६५४ २५९१७१

६)माणगाव १३७९५२ १४०३६१

७)अलिबाग १६२२७४ १४३८२७

८)रोहा १२५२२० १२२४२५

९)महाड ११०६०२ ९७५३६  

१०)तळा ४००२३ ३४५०२ ११)मुरूड ५२६९३ ५२३०८    

१२)सुधागड ६७८७६ ५०२२८

१३)पोलादपूर ३९५२१ २२२०७

१४)श्रीवर्धन ३४२९८ ३२२९८

१५)म्हसळा २९८४४ २५०७४

-----------------------------------------------------------------

 एकूण १६३४०२३ १५२०४०३

--------------------------------------------------------------