पुणे: वडगावशेरी येथील गोदामांना लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यास अर्धा ते एक तासाचा कालावधी लागला, त्यामुळे आगीची भीषणता वाढली यात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. यामुळे या घटनेनंतर परिसरात मंजूर अग्निशमन केंद्राचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आग लागली, आता तरी अग्निशमन केंद्राचे काम पूर्ण करा, अशी चर्चा घटनास्थळी तसेच परिसरात होती.
वडगावशेरी परिसरासाठी अग्निशमन केंद्र मंजूर आहे. आमचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे जवळ केंद्रच नसल्याने खराडी, वडगावशेरी आणि चंदननगर या भागासाठी प्रशासनाने अग्निशमन केंद्र मजूर केले आहे, त्या जागेवर बाधंकामही केलेले आहे. मात्र, या केंद्राचे काम अद्यापही येथे सुरु झालेले नाही. याबाबतच्या काही प्रक्रिया लालफितीत अडकल्या आहेत. त्यामुळे या भागात कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर येरवडा येथील अग्निशमन दलावर अवलंबून राहावे लागते. परिणामी, दुर्घटनेची व्याप्ती वाढत असल्याचे आतापर्यंत घडलेल्या घटनेतून उघड झाले आहे. आजच्या वडगावशेरी येथील आगीच्या घटनेतही हीच बाब पुन्हा समोर आली. अग्निशमन केंद्र जवळ असते तर या आगीत मोठे नुकसान झाले नसते.
अग्निशमन केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रशासनाने याची अद्याप दखल घेतली नाही. ही बाब दुर्दैवी आहे. या आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
योगेश मुळीक, माजी अध्यक्ष स्थायी समिती
गेल्या काही वर्षाच्या कालावधीत या भागात अनेक भीषण दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरासाठी अग्निशमन केंद्र तातडीने सुरु होणे गरजेचे आहे. प्रशासन सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. यापुढे गप्प बसणार नाही, वेळ पडल्यास सर्वपक्षीय आंदोलन केले जाईल.
महेंद्र पठारे, माजी नगरसेवक
गेल्या काही वर्षाच्या कालावधीत या भागात मोठ्या प्रमाणावर आयटी पार्क उभे राहिले असून मोठ्या इमारतीही झाल्या आहेत, त्यामुळे या भागात अग्निशमन केंद्र असणे गरजेचे आहे. महापालिकेची ही जबाबदारी आहे. मात्र, प्रशासन उदासीन आहे.
शंकर संगम, विभागप्रमुख शिवसेना
याबाबत अनेकवेळा प्रशासनाशी संपर्क साधला, निवेदनेही दिली आहेत, असे असतानाही प्रशासन कोणतीही कार्यवाही करीत नाही. त्यामुळे यापुढील दुर्घटना घडल्यास संबंधीत खात्यातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
दर्शना पठारे, सामाजिक कार्यकर्त्या