‘कोविड-१९’ विषाणू पादुर्भावाच्या दरम्यान गावोगावी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना सदर महामारीपासून वाचविण्यासाठी पोलीस पाटलांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. पोलीस प्रशासनाचा अविभाज्य भाग असलेल्या पोलीस पाटीलांवर कोविडदरम्यान फार मोठी जबाबदारी होती. त्यावेळी आपले कर्तव्य बजावत असतांना अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी गृह विभागाने कोविड-१९ कर्तव्य बजावत असतांना मयत झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना सांत्वन म्हणून ५० लाख रुपये मदत देण्याचे शासन परिपत्रकाद्वारे जाहीर केले होते.त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ग्राम शेलगाव बोंदाडे येथील पोलीस पाटील भाऊराव रामराव वाझुळकर हे दि.१०.०४.२०२१ रोजी कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने मयत झाले होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी उषा भाऊराव वाझुळकर व दोन मुले सुदर्शन व स्वप्नील हे होते. महामारीदरम्यान कर्तव्य बजावत असतांना कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाने सदर पोलीस पाटील मयत झाल्यामुळे शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ श्रेणी लिपिक हर्षा मानेवाघ व वर्षा गायकवाड यांनी प्रस्ताव तयार करून शासन दरबारी सादर केला होता. सदर प्रस्तावाचा वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मयत पोलीस पाटील स्व.भाऊराव रामराव वाझुळकर यांच्या कुटुंबियांना आज दि.०३.११.२०२२ रोजी ५० लाखांचा धनादेश पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्याहस्ते वितरीत करण्यात आला.अजूनही दोन मयत पोलीस पाटलांचा मदत निधीचा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित असून त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. सदर धनादेश पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्याहस्ते,अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या उपस्थितीत वाझुळकर कुटुंबियांना वितरीत करण्यात आला.