परभणी(प्रतिनिधी)जिल्ह्यातील पाथरी नगर परिषदच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने गुरूवारी(दि.3) एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. हे निवेदन देताना माजी आमदार मोहन फड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उध्दव नाईक, बाळासाहेब जाधव, प्रा.पी.डी.पाटील, डॉ.राजेंद्र चौधरी, संतोष जोगदंड, दादाराव रासवे यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथरी न.प.अंतर्गत व्यवहारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून यात प्रामुख्याने न.प.ने अनेक ठिकाणी एन.ए.लेआऊट न करताच पीटीआर दिलेल्या आहेत. त्यात न.प.ने सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यात सर्वे नं.83,84 14/1, 81 व 88 सर्वे नंबर माळीवाडामध्ये काही ठिकाणी नुसते लेआऊट करून मालमत्ता रजिस्टरला मालकी नोंद घेण्यात आल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. त्या कोणत्या आधारे घेण्यात आल्या? यात ज्या ठिकाणी एन.ए.लेआऊट झाले तेथील मोकळी जागा विकण्यात आली व ती विकताना नगर परिषदने नाहरकत प्रमाणपत्र कसे दिले? तसेच सर्वे नं 83/84 माळीवाडालगत लेआऊट करून कोणतीही मोकळी जागा ठेवण्यात आली नाही तसेच गावठाणची जागा होती त्याचे पीटीआर तयार करून प्लॉट विकण्यात आले, असाही आरोप करण्यात आला आहे.
तसेच सर्वे नंं.1/2 मधील हिंदू स्मशानभूमीच्या जागेवर प्लॉटींग कोणी केली व त्याचे खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे झाले आणि त्यास न.प.ने नाहरकत कसे दिले? त्याचप्रमाणे सर्वे नं.88 मध्ये मातंग समाजाची स्मशानभूमी होती त्या जमिनीवर एन.ए.लेआऊट करताना ती सोडण्यात आली नाही व एन.ए.लेआऊट करतांना मोकळी जागा सोडण्यात आली नाही, त्यावेळी न.प.ने आक्षेप घेतला नाही.
तसेच सर्वे नं 14/1 माळीवाडा ही जमीन नेताजी सुभाष विद्यालयाची होती. या जागेवर न.प.ने समाज मंदिर कसे बांधले? व त्या ठिकाणी काही लोकांना रातोरात बसवून अतिक्रमण करण्यात आल्याचाही आरोप केला आहे. त्या लोकांची मालमत्ता रजिस्टरला नोंद घेवून त्यांना कशाच्या आधारे मालकी देण्यात आली व त्यांना पीटीआर कसा देण्यात आले व त्या ठिकाणी घरकुल कसे देण्यात आले? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच पाथरी न.प.अंतर्गत कोहीनुर कंन्स्ट्रक्शन ही आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नातेवाईकांची असून या एजन्सीने गेल्या 18 वर्षात किती कामे केली व त्यांना कामे कशी मिळाली याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामागे पाथरी नगर परिषदेवर कार्यरत असलेले व सत्तेत असलेले नगराध्यक्ष व नगरसेवक व त्यांचे नेतृत्व करणारे आमदार बाबाजानी दुर्राणी हे जबाबदार असल्याचा आरोप शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केला आहे. याची सखोल चौकशी करण्यात यावी व आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.