मोहाडी: तस्करापासून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तहसीलदार यांनी आपल्या लायसेंस बंदूकीने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

वाळू तस्करांद्वारे जेसीबीच्या पंजाने तहसीलदार दीपक कारंडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होत होता. हे लक्षात येताच मोहाडी तहसीलदार यांनी दोन गोळ्या राउंड फायर केल्या. या प्रकरणी फिर्यादी तहसीलदार यांच्या तक्रारीवरुन जेसीबी आणि टिप्पर चालक तसंच मालक यांच्याविरुद्ध मोहाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. जेसीबी चालकाला मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे.

भंडारा उपविभागिय अधिकारी यांना वाळू तस्कराद्वारे मारहाण झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता तहसीलदार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळू तस्करांची मुजोरी समोर आली आहे. काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे यांना रोहा या गावी तस्करांनी साठवून ठेवलेली वाळू जेसीबीद्वारे टिप्पर मध्ये भरुन चोरी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. तहसीलदार कारंडे यांनी त्यांच्या चमूसह रोहा येथे प्रत्यक्ष भेट दिली.

यावेळी जेसीपीद्वारे टिप्परमध्ये वाळू भरण्याचे काम सुरु होते. दरम्यान तहसीलदार यांनी ते काम थांबवून आम्हाला शासकीय कार्यवाही करण्यास मदत करावी असं आवाहन जेसीबी चालकाला केले. मात्र जेसीबी चालकाने त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्याद्वारे हल्ला चढविला. तहसीलदार यांनी यातून स्वतःचा बचाव केला असता जेसीपी चालकाने तिथून जेसीपी घेवून पळ काढू लागला.

दरम्यान तहसीलदार यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जेसीबी चालकाने पुन्हा त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्याने जीवघेणा हल्ला केला. आपल्यावर दोनदा झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे तहसीलदार यांनी स्वतःच्या संरक्षणार्थ त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीने हवेत दोनदा गोळीबार केला. गोळीबार होताच जेसीबी चालक घाबरून जेसीबी तिथेच सोडून पळून गेला. लगेचच या संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदार यांनी मोहाडी पोलिसांना दिली.

मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जेसीपी आणि टिप्पर ताब्यात घेतले आहे. मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जेसीबी चालक, मालक, तसेच टिप्पर चालक आणि मालक यांच्याविरुद्ध कलम 353, 379 नुसार गुन्हा नोंद केला गेला आहे. सध्या जेसीपी चालकाला अटक करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी आढळल्यास इतरही लोकांवर गुन्हा नोंद करून अटक केली जाईल, असे पोलीस अधीक्षक लोहित मतानींनी यावेळी सांगितलं