पुणे: नगर रस्त्यावरील वडगाव शेरी परिसरात एका भंगार मालाच्या गोदामाला गुरुवारी दुपारी आग लागली. या आगीत प्लास्टिक साहित्य, टाकाऊ वस्तू जळून भस्मसात झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गोदामातील साहित्य पेटल्याने मोठी आग भडकली होती. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होती. तर आगीमुळे गोदामातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे बंब, टँकर अशा १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलातील आठ अधिकारी आणि ५० जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
जवानांनी पाण्याचा मारा करुन तासाभरात आग आटोक्यात आली. गोदामातील प्लास्टिकच्या वस्तू, लोखंडी माल, डबे, भांडी तसेच अन्य साहित्य जळाले. आतमध्ये कोणी कामगार अडकला नसल्याची माहिती गोदाम मालकाने दिली. गोदामात भंगार माल असल्याने आग धुमसत होती. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचे जवान तेथे थांबले होते. आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागले, असे पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.