शिरुर: रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकीदरम्यान मतदारांना प्रलोभन दाखवू नये यासाठी दोन भरारी पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

शिरुर पोलिस स्टेशन येथे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने कारखाना संचालक निवडणूक निर्भयपणे व शांततेत व्हावी म्हणून दिग्विजय आहेर विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे तथा निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना न्हावरे व सहायक निंबधक सहकारी संस्था शिरुर शंकर कुंभार यांचे समवेत शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षकसंदिप यादव यांची पोलिस स्टेशन येथे मिटिंग झाली.

निवडणुकी मध्ये पैशाचे प्रलोभन मतदारांना कोणी दाखवू नये यासाठी सयूंक्त पणे दोन भरारी पथके तयार केली आहेत. भरारी पथका मार्फत ठीक - ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. तरी कोणीही मतदारांना पैशाचे प्रलोभन अथवा कोणी मतदानासाठी पैसे वाटप करत असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी घोडगंगा साखर कारखाना न्हावरे तथा जिल्हा निबंधक कार्यालय अथवा शिरूर पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे तसेच सदरची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पार पाडावी, असे आव्हान शिरुर पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.