गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील एका गादी कारखान्याला गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत गाडी कारखान्यातील सर्व सामान जळून खाक झाले असून सुमारे 12 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, शृंगारतळी गणेशनगर येथील विरेंद्र चौघुले यांच्या गादी कारखान्याला सकाळी आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने विरेंद्र चौघुले यांचे राहते घर आणि गादी कारखान्याचे मोठे नुकसान झाले. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र काही केल्या आग आटोक्यात येत नव्हती. बऱ्याच अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या आगीत सुमारे 10 ते 12 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.