चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील वहाळफाटा ते सावर्डे पिंपळ मोहल्लापर्यंत रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गुहागर विधानसभा मतदारसंघ तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने येथील राष्ट्रीय महामार्ग उपयोगाच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला.

तर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना समोर मृत्यू दिसतो, अशा शब्दात भावना व्यक्त करताना या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असले तरी अजूनही या कामाला तितकीशी गती मिळाली नाही. सर्विस रोडची दुरावस्था झाली आहे. तर वहाळ फाटा ते सावर्डे पिंपळ मोहल्लापर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून वाहन चालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महामार्ग उपयोगाच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला. यानंतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यानुसार गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत परशुराम ते खेरशेत पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कधी पूर्ण होईल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी कामथे, कोंडमळा, सावर्डे, आगवे, वहाळफाटा मार्गावरील खड्डे व सर्व्हिस रोडप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठेकेदार कंपनी विरोधात घोषणाबाजी करीत खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून बोंबाबोंब आंदोलन केले होते. तसेच खड्ड्यांमध्ये भात पेरणी करून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कार्यालयात साप सोडण्याचा इशारा देखील दिलेला होता. आता वहाळ फाटा ते सावर्डे पिंपळ मोहल्ला पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या मार्गावर वाहन चालवणे अवघड होऊन बसले आहे. तसेच दुचाकी स्वारांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरीत हा मार्ग धोकादायक बनला असून किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. तरी या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता शासन प्रशासन व ठेकेदार कंपनी विरोधात वहाळ फाटा ते पिंपळ मोहल्ला पर्यंत 'मूक मोर्चा आंदोलन करणार आहोत यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी विभाग प्रमुख संदीप राणे, पंकज साळवी, अशोक चव्हाण, कृष्णा घाणेकर आदी उपस्थित होते.