लखनौ: उत्तरप्रदेशच्या लखनौ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई-वडील हे मुलांसाठी सर्वांसाठी दैवत असते. ज्यांची मुले आहेत त्यांना म्हातारपणी कशाची चिंता असते, असे म्हटले जाते. मात्र, 85 वर्षीय रामेश्वर प्रसाद या वृद्धाची व्यथा ऐकून तुमचेही डोळे पाणावतील. कारण येथील एका वृद्धासोबत आपल्याच मुलांकडून धक्कादायक प्रकार घडला. मागील 3 दिवसांपासून वृद्ध वडिलांना घरात घेण्यासाठी 2 मुलांचे समुपदेशन सुरू आहे. मात्र, सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आणि मुलांच्या वाई वागण्यामुळे वैतागलेल्या बापाने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
वृद्धाश्रमात डोक्यावर छत आणि खायला इज्जतीचे अन्न मिळेल. तसेच राहिलेले आयुष्याचे 4 दिवस राहिले इथेच काढेन. मात्र, मुलांसोबत जाणार नाही, अशी भूमिका या वृद्ध बापाने घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणी वृद्धाने पोलिसांकडे तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन मुलगा विजय आणि बृजेश यांच्यावर मारहाण आणि छळवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृद्ध बापाचा आरोप काय
या वृद्धाच्या दोन्ही मुलांनी त्यांचा छळ केला. मोठ्या मुलाने तर त्यांच्यावर हात उगारत मारले आहे. तसेच त्यांना घरातून अपमानास्पद वागणूक देत बाहेर काढले. यानंतर आजारपणात एका हातात युरिन बॅग घेऊन वृद्ध रस्त्यावर पडला होता. तेव्हा वन स्टॉप सेंटरच्या टीमच्या मदतीने या वृद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या घरात 2 कमवती मुले आणि 4 मुली असूनही बापाला दारोदारी भटकत राहावे लागले. मुलांनी त्यांना घरातून बाहेर काढले. तसेच मुले आहेत त्यांच्याकडे जा, आमच्याकडे ठेऊ शकत नाही, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांच्या मुलीनेही सुनावले.
दरम्यान, एका सामाजिक संस्थेने युरिन बॅग घेत रस्त्यावर पडलेल्या रामेश्वर प्रसाद यांना पाहिले. यानंतर मागील सोमवारी त्यांना सरोजनीनगरच्या वृद्धाश्रमात ठेवण्यात आले. या सेंटरच्या एका कार्यक्रमावेळी रामेश्वर प्रसाद यांनी पत्र लिहून स्वत:ची व्यथा मांडली.
वयामुळे काम बंद झालं आणि घडला धक्कादायक प्रकार
त्यांचे जुन्या टिकेतगंज येथे घर होते. तसेच ते मसाल्याचे काम करत होते. मात्र, वाढत्या वयामुळे त्यांचे काम बंद झाले. दरम्यान, त्यांच्या 4 मुलींचेही लग्न झाले आहे. तर मुले वाहन चालक म्हणून काम करतात. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर ते बलरामपूर हॉस्पिटलमध्ये जात दाखल झाले होते. याठिकाणी त्यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुलीच्या घरी गेल्यावर तिनेही तिच्या घरात ठेवण्यास नकार दिला. कमाई बंद झाल्यानंतर मी ओझे बनून जगत आहे. मोठ्या मुलाने मला दोनवेळा मारहाण केली. आता कामही करु शकत नाही. जेवणाची आणि औषधाची चणचण जाणवते, असे व्यथा त्यांनी मांडली.