दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रात पोहून बाहेर आल्यानंतर पुणे येथील 31 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. स्वप्नील रामचंद्र पाटील (31, हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील हा आंजर्ले येथील समुद्र किनार्यावर मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता. समुद्रात पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर तो पाण्याच्या बाहेर आला. बाहेर आल्यानंतर अचानक त्याला चक्कर आली आणि लगेच उलटी झाली. मित्रांनी लगेचच त्याला दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. अचानक झालेल्या या घटनेने सारे मित्र घाबरुन गेले. गोंधळलेल्या स्थितीत त्यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांना फोन केला. घडलेला प्रकार कानावर घातला. त्यानंतर स्वप्नीलचा मृतदेह पुणे येथे नेण्यात आला. मात्र या दुर्दैवी घटनेने मित्रांना शॉक बसला. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.