गुहागर : नगर पंचायतीची डांबरीकरणाच्या कामाच्या निविदेमधील हॉटमिक्स व पेवर फिनिशींगच्या कामे मिळविण्यासाठी देवघर येथील बंद असलेला हॉटमिक्स प्लान्ट दाखविला जात असून या बोगस प्लान्टवर कामे मिळविणाऱ्या ठेकेदारांच्या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे यानी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

गुहागर नगर पंचायतीच्यावतीने कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी डांबरीकरनाच्या कामासाठी हॉटमिक्स व पेवरफिनिशींगने करावीत, अशी अट टाकली जात आहे. मात्र त्याप्रमाणे असलेल्या अटीचे आपल्या प्रशासनाकडून पालन केले जात नसल्याचे निलेश मोरे यांनी गुहागर नगर पंचायतीला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आतापर्यंतच्या डांबरीकरणाच्या कामामध्ये देवघर येथील हॉटमिक्स प्लान्ट दाखविला जात आहे. मात्र या मशिनरीने गुहागर शहरामध्ये या आधी कोठेही कामे केलेली आढळून आलेली नाहीत. यामुळे कागदोपत्री अट टाकून काही मोजक्याच ठेकेदारांना अशी कामे मिळण्यासाठीची नगर पंचायतीकडूनच सेटींग केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नुकतीच गुहागर नगर पंचायतीने दुर्गादेवी मंदिराजवळील रस्ता तयार करणे, खालचापाट जांगळवाडी येथे रस्ता तयार करणे, गुहागर बागमधील रस्ता तयार करणे, अशा तब्बल ३३ लाख रूपये कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या तीन कामांकरिता हॉटमिक्स, पेवरफिनिशींगने कामे करावयाची अट टाकण्यात आली. सदर कामांची निविदा ज्या ठेकेदारांनी भरली आहेत. त्यांनी कागदोपत्री वरील अटी पूर्ण केल्या आहेत. जवळच्या गुहागर तालुक्यातील गुहागर-चिपळूण | मार्गावरील देवघर येथील हॉटमिक्स प्लांट दाखविता, ज्या प्लान्टमध्ये यापूर्वी कोणतेच काम केले गेले नाही. अशा बंद पडलेल्या व केवळ | याठिकाणी प्लांट आहे. हे दाखवून कामाची निविदा भरली आहे. यामुळे आता ज्या ठेकेदाराने सदर प्लान्ट दाखविला आहे. त्याच प्लांन्टवरील मशिनरीने कामे करावीत, अशी आमची मागणी आहे. अन्यथा सदरचे काम आम्हाला थांबवावे लागतीत. प्रशासनालाही माहीत असूनही हा बंद असलेल्या प्लान्ट गृहीत धरून संबधीत ठरावीक ठेकेदारांना कामे दिली जात आहेत.

दरम्यान, गुहागर नगर पंचायतीमध्ये सुरू असलेल्या या अजब प्रकाराबाबत मुख्याधिकारी यांनी वेळीच दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी लागले, असेही या तक्रारीत म्हटले आहे. ज्या ठेकेदाराला नगर पंचायत सदर कामे देत आहे, त्या ठेकेदाराने लिहून दिलेल्या करारनाम्याप्रमाणे काम करण्याचा आग्रह धरला पाहिजे व तशी त्यांच्याकडून खातरजमा करूनच त्याना कार्यारंभ आदेश द्यावा, अशीही मागणी श्री. मोरे यांनी केली आहे.