शिरुर: घोडगंगा सहकारी कारखान्यानंतर चार वर्षांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सुरु झाला. सन 2018-19 साली घोडगंगा कारखान्याला एक पोत साखर तयार करण्यासाठी 1564 तर भिमाशंकर साखर कारखान्याला 706 रुपये खर्च आला. अडीच वर्षांपुर्वी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर घोडगंगाला एक पोत साखर तयार करण्यासाठी 2240 तर भिमाशंकरला 757 खर्च आला. त्यामुळे आपल्या शेजारील कारखान्याच्या तुलनेत आपल्या कारखान्याला एका पोत्याला सुमारे 1500 रुपये खर्च जास्त कसा येतो असा सवाल ऍड सुरेश पलांडे यांनी आलेगाव पागा येथे केला.

घोडगंगा साखर कारखान्यात विद्यमान अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांनी 20 ते 25 वर्षात प्रचंड मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करुन आपल्या नातेवाईकांना पुढे करुन खाजगी साखर कारखाना काढला असल्याचा आरोपही पलांडे यांनी केला. यावेळी बोलताना दादापाटील फराटे म्हणाले, आमदार अशोक पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या विकासाबाबत बोलण्याऐवजी इतर मुद्यावर बोलतात परंतु सभासद शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी हि निवडणूक हातात घेतली असुन आम्ही गेले अडीच वर्ष शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना वाचावा म्हणुन संघर्ष करत आहोत. त्यामुळे आमच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनलला साथ द्या असे आवाहन दादापाटील फराटे यांनी शेतकऱ्यांना केले.