रत्नागिरी : तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील नाणीज बस स्टॉप लगतच्या सरोदेवाडी येथे काल रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने महिलेच्या डोक्यात लोखंडी सळीने वार करून महिलेला गंभीर जखमी केले. त्यानंतर महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केला. महिला ओरडल्याने व शेजाऱ्याची चाहूल लागल्याने तो साडेबारा तोळे दागिने घेऊन पळून गेला. या घटनेमुळे परिसरात घाबराट पसरली आहे. महिलेवर पाली ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
काल रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली. या घरात विजया विलास केतकर (६५) एकट्याच राहतात. त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले आहे. मुले रत्नागिरीला असतात. त्यामुळे पाळत ठेऊन हा प्रकार घडला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. चोरट्याने मागील दाराने घरात प्रवेश केला. त्यावेळी त्याने स्वयंपाक घरात असलेल्या श्रीमती केतकर यांच्या डोक्यात सळीचे दोन प्रहार केले. त्या रक्तबंबाळ होऊन ओरडत खाली कोसळल्या. दरम्यान चोरट्याने त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले, तसेच कपाटातील असे मिळून अंदाजे साडेबारा तोळे दागिने घेऊन पोबारा केला. त्या महिलेच्या एका हातातील सोन्याचा बांगड्या त्याला काढता आल्या नाहीत. धांदलीत त्याने रिंगा व किरकोळ दागिने वाटेत टाकले. महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावले. त्यांनी लोकांच्या मदतीने जखमीला पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
दरम्यान पोलीस घटनास्थळी धावले, त्यांनी पंचनामा केला शेजाऱ्यांचे जाबजबाब घेतले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले आहे. रक्ताने माखलेली साली त्याने तिथेच टाकली आहे. याबाबत पाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. त्यांना अंमलदार मोहन कांबळे, संतोष कांबळे, राकेश तटकरी व अन्य सहाय्य करीत आहेत. याशिवाय रत्नागिरी ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी दोन स्वतंत्र पथके स्थापन करून चोरट्याचा तपास सुरू केला आहे. काल रात्रभर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने चोराचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कुठेही चोर सापडला नाही.
घटनास्थळी फॉरेन्सिक सपोर्ट युनिट रत्नागिरीचे अक्षय कांबळे अंगुली मुद्रातज्ञ एपीआय अमोल कदम आले होते. त्यांनी आवश्यक पुरावे गोळा केले. रात्रीच श्वानपथक मागविण्यात आले, मात्र ते घराजवळ, महामार्गपर्यंत आले व तिथेच घुटमळले.
घटनेची माहिती कळताच वाडीतील व नाणीज गावातील लोकांनी गर्दी केली. या भागातील अशी पहिलीच घटना आहे. त्यामुळे सारे चिंतेत आहेत. पोलीस पाटील नितीन कांबळे, सरपंच गौरव संसारे,तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्ताराम खावडकर घटनास्थळी पोहोचले. एकूण या प्रकारामुळे परिसरात व नजीकच्या गावात खबराट पसरली आहे. लोक भीतीच्या छायेत आहेत.