रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित केल्या आहेत. ज्या शिक्षकांनी गेली अनेक वर्षे सुगम क्षेत्रात काम केले आहे, त्यांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. त्यासाठी यंदा नव्याने निश्चित केलेल्या ६८६ अवघड क्षेत्रातील शाळांची यादी निश्चित केली आहे. ती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली गेली आहे.
गेले काही महिने रखडलेली बदली प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश नुकतेच ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झाले आहेत. ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. त्यासाठी आवश्यक माहिती भरण्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यात अवघड क्षेत्रातील शाळांची यादी निश्चित करुन ती सरल पोर्टलवर भरण्यात आली आहे. बदली प्रक्रियेमध्ये अवघड क्षेत्रात काम केलेल्यांचा कार्यकाळ जुन्या यादीप्रमाणे ठरवण्यात येणार आहे. दोन वर्षांपुर्वी अवघड क्षेत्रात ८४६ शाळा होत्या. त्या शाळांमध्ये काम केल्याची वर्षे बदलीतील निकषांमध्ये विचारात घेतली जातील. बदलीच्या ठिकाणी नियुक्ती देताना नवीन निकषाप्रमाणे यंदा ज्या शाळा अवघड क्षेत्रात निश्चित केल्या आहेत, त्यामध्येच बदली केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. नवीन निकषांमध्ये ६८६ शाळा अवघड क्षेत्रात आहेत. जुन्या यादीतील १६० शाळा कमी झाल्या आहेत. अवघड क्षेत्रातील शाळांची यादी निश्चित झाल्यामुळे बदलीसाठी त्यांचाच विचार केला जाणार आहे.