विठ्ठलवाडी येथे पहाटे पहाटे फुलतोय भक्तीचा मळा

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी: 

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) परिसरातील मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा दरम्यान दररोज पहाटे चार वाजता गावातील भजनकरी व नागरिक काकडा भजन कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्यामुळे विठ्ठलवाडी परिसरात रोज पहाटे पहाटे भक्तीचा मळा फुलत आहे.

विठ्ठलवाडी येथे सकाळच्या पहिल्या प्रहरी भगवंतांचे स्मरण करत, विविध उपदेशात्मक, जीवनाविषयी ज्ञान देणाऱ्या संतांच्या अभंग, गौळणी कानी पडल्याने लहान मुलांपासून ते वयस्कर आजोबापर्यंत सर्व आबालवृद्धांचा दिवस भक्तिमय प्रेरणात्मक वातावरणाने सुरू होत आहे. संत वचने कानी पडल्याने विठ्ठलवाडी करांची सकाळ ज्ञानमय व चैतन्यदायी होत आहे.भक्तिचिये पोटी पांडुरंगाची काकड आरती वीणा, पेटी वादन, टाळ व मृदूंगाचा गजर करीत, अंतःकरणापासून मुखाने हरिनामाचा जयघोष करून संताच्या अभंगांच्या तालावर पांडुरंगाचा धावा करून प्रसन्न करणाऱ्या काकडा आरती दररोज पहाटे होत आहे प्रत्येक मंदिरांमध्ये अभंग, वासुदेव, पांगुळ, नाटाचे अभंग गौळणी गात भक्तिरसात ग्रामीण डौलात, ठेक्यात आणि भरदार आवाजात काकड़ आरती सुरु असते. सर्व भजनी मंडळे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने येथे पहाटेच्या काकड आरतीने गावकऱ्यांना जाग येत असून सुरू असणाऱ्या काकड आरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात.

गावात काकडा आरती घेण्यासाठी आणि रोज काकडा भजनकरी भाविकांनासकाळी प्रसादाचे नियोजन केलेले आहे गावात दरवर्षी विठ्ठल मंदिर, हनुमान,श्रीराम मंदिर या मंदिरामध्ये काकडा भजन व काकडा आरती सुरू आहे. विठ्ठल मंदिरामध्ये सुरू असलेल्या काकडा भजनास ह.भ.प नवनाथ गवारे, विलास गवारे, संभाजी शिंदे, संदीप शिंदे, विलास शिंदे, सहदेव भरणे, सोमनाथ गवारे, रामदास गवारे, योगेश गवारे,नंदकुमार चौधरी,लक्ष्मण गवारे, आण्णा ठोंबे, अंकुश शेलार, स्वामी महाराज,आण्णा गवारे, विश्वनाथ गवारे, पंडित गवारे, ललिता गाडे, कमल गवारे, सुभाष गवारे, सिंधुबाई गवारे, कांतीलाल कंगणे,शालन कातोरे,माई गवारे पप्पू रायकर व इतर भाविक भक्त उपस्थित असतात.