औरंगाबाद:- दि. २९ (दीपक परेराव ) - महापालिकेत समावेश झालेल्या सातारा-देवळाई ग्रामपंचायतीमधील ४२ कर्मचाऱ्यांना आस्थापनेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यापैकी ३४ कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले असून, ८ कर्मचारी दैनिक वेतनावर आहेत. या कर्मचाऱ्यांनादेखील मनपाच्या आस्थापनेवर घेण्यात यावे, अशी मागणी पूर्व विधानसभा संघटक तथा माजी सभापती राजू वैद्य यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात न्यायालयाचा दरवाजा कर्मचाऱ्यांनी ठोठावला असून, याबाबत सादर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे ठराव साधारणपणे २०१३ पर्यंत घेण्यात आलेले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना मनपा आस्थापनेवर समाविष्ट करून घेण्यात येत आहे. परंतु, आठ कर्मचाऱ्यांना ज्यांचे ठरावदेखील २०१३ चे आहेत. त्यांना यामधून वगळण्यात आले आहे. त्याऐवजी २०१४ मध्ये ठराव घेतलेल्या दोन कर्मचाऱ्यांना मात्र मनपा आस्थापनामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची पायमल्ली झाल्याचे दिसून येत आहे. (शासन निर्णय क्रमांक औ.म.पा. २०२१/प्र.क्र. ४१३ नवि २४) यामध्ये स्पष्टपणे ५ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे २००० नंतर कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला कुठलाही कायमस्वरूपी घेण्यात आलेला नाही, असे निर्देश देण्यात आले आहे. त्याचे पूर्णपणे उल्लंघन झाले असून २००६ ते २०१४ च्या नियुक्तीधारकांना कायमस्वरूपी घेण्यात आल्याचे दिसते.

या सर्व बाबीचा विचार करता यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेला दिसतो, असा आरोपही राजू वैद्य यांनी केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांची कागदपत्रे पाहिली असता पुरुष कर्मचाऱ्यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र महिला महाविद्यालयातून देण्यात आल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून सर्व कर्मचाऱ्यांना नैसर्गिक न्याय देऊन मनपाच्या आस्थापनावर समाविष्ट करावे. या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजू वैद्य यांनी केली आहे.