शिरुर: शिरुर तालुक्यात एक घोडगंगा सहकारी साखर कारखाना असताना आणि अशोक पवार स्वतःच त्या कारखान्याचे अध्यक्ष असताना तालुक्यातच दुसरा खाजगी साखर कारखाना काढण्याच पाप आमदार अशोक पवार यांनी केल असुन घोडगंगा साखर कारखाना म्हणजे राजकारणाचा अड्डाच झाला आहे. त्यांचा स्वतःचा खाजगी कारखाना नफ्यासाठी चालवता आणि घोडगंगा साखर कारखान्यातील कामगारांना मात्र पाच महिने पगार दिला जात नाही हि वस्तुस्थिती असल्याची टिका दादा पाटील फराटे यांनी केली.
शुक्रवार (दि 28) रोजी न्हावरे येथे ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरात सायंकाळी 7 च्या सुमारास सर्व उमेदवारांनी दर्शन घेतले. तसेच 51 महिलांच्या हस्ते नारळ फोडून घोडगंगा किसान क्रांती पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून घोडगंगा कारखान्याच्या उभारणीत मोलाचा वाटा असणारे संस्थापक सदस्य माऊली काळे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना फराटे पुढ म्हणाले, गेली 25 वर्ष मी घोडगंगा कारखान्याला ऊस घालतो. म्हणूनच मला हा कारखाना आणि सभासदांविषयी तळमळ आहे. मी कारखान्याच्या 10 वर्ष उपाध्यक्ष होतो. त्या काळात कारखान्याला अनेक पुरस्कार मिळत होते. परंतु आता मात्र कारखान्याची अवस्था बिकट झाली असुन याला सर्वस्वी अशोक पवार जबाबदार आहेत. तालुक्यातील इतर संस्था अशोक पवारांच्या नेतृत्वाखाली चांगल्या चालतात असं तिथले पदाधिकारी सांगतात. मग 25 वर्ष साखर कारखाना तुमच्याच ताब्यात असताना त्याला आज जप्तीची नोटीस कशी आली याच उत्तर द्या...? असा सवाल दादापाटील फराटे यांनी केला.
यावेळी बोलताना अॅड सुरेश पलांडे म्हणाले, अशोक पवार यांच्याकडे गेली 25 वर्ष एकहाती सत्ता असतानाही कारखान्याच विस्तारीकरण झालं नाही. तसेच याच कारखान्याच्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वतःचा खाजगी कारखाना काढला. 25 वर्षात निवडून गेलेल्या 100 संचालकापैकी एकाला तरी स्वतःच्या मर्जीनुसार काम करता आलं का...? आपल्याला डोईजड झालेल्या माणसाला जमिनीवर आणण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. अशोक पवार म्हणतात माझा व्यंकटेशशी काहीच संबंध नाही तर मग व्यंकटेशच्या गाळपासाठी तुम्ही पत्नी, मुलगा आणि मुलीच्या नावे 100 कोटी रुपयांच कर्ज का काढलं...? असा प्रश्न यावेळी पलांडे यांनी विचारला.
प्रचारसभेत बोलताना काकासाहेब खळदकर म्हणाले, कारखान्यात सत्ताबदल करण्यासाठी सभासदांना हि शेवटची संधी आहे. कारण आता संघर्ष करुन आम्ही पण थकलोय. सन 2012 पासुन गेले दहा वर्ष मी स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे, दादापाटील फराटे, अॅड सुरेश पलांडे यांच्यासोबत सभासदांसाठी मुंबई पर्यंत कोर्ट कचेऱ्या करुन जाब मागितला आहे. तसेच स्थानिक भूमीपुत्रांनी कारखान्याला दिलेली पाच एकर जमिन अशोक पवार यांनी चुकीच्या पद्धतीने शिक्षणसंस्थेला दिली यावर आमचा आक्षेप आहे.
यावेळी सुधीर फराटे म्हणाले, स्वर्गीय संभाजीआण्णा भुजबळ या माणसाने घोडगंगा साखर कारखान्याचं लायसन्स आणून दिल. त्या माणसाच्या वारसाची कारखान्यात कुठंच नोंद नाही हेच मोठ दुर्दैव आहे. घोडगंगा कारखान्याच्या उभारणीत ज्या 19 हजार सभासदांचं योगदान आहे. त्यातील 5 हजार सभासद मयत असतानाही त्यांच्या वारसांची नोंद का झाली नाही. अशोक पवार यांचा मुलगा घोडगंगा साखर कारखान्यात बिनविरोध संचालक झाल्यानंतर काही मयत सभासदांच्या वारसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. "चेअरमन साहेब तुमचा मुलगा कारखान्यात बिनविरोध संचालक झाला आमच्या आई वडिलांनी घेतलेल्या शेअर्सवर आमची किमान वारस म्हणून नोंद तरी करा". तसेच निवडणुकीच्या काळात जर कारखान्याचे कामगार आणि कारखान्याच्या यंत्रनेचा जर कारखान्याच्या सत्ताधारी लोकांनी चुकीच्या पद्धतीने वापर केला तर त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असा इशारा सुधीर फराटे यांनी दिला.
यावेळी पांडुरंग थोरात, आबासाहेब गव्हाणे, राहुल पाचर्णे, बाळासाहेब फराटे, राहुल गवारे, आबासाहेब सोनवने, जयेश शिंदे, रोहित खैरे, अरविंद ढमढेरे, रामभाऊ सासवडे, राजेंद्र कोरेकर, विजय भोस, वीरेंद्र शेलार, राजेंद्र गदादे, आत्माराम फराटे, कैलास सोनवने, भगवान शेळके, एकनाथ शेलार, गोविंद फराटे, सचिन शेलार, नितीन पाचर्णे व अनेक मान्यवर उपस्थित होते.