शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, तळेगाव ढमढेरे येथील न्हावरा रस्त्याच्या कडेला गावातील धनदांडग्या व्यक्तींसह राजकीय लोकांनी अतिक्रमण करत व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम सुरु केले आहे. याबाबत अनेक तक्रारी होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याबाबत लेखी आदेश संबंधित व्यक्तींनी दिले आहे,
मात्र दिवाळीच्या सुट्टीचा फायदा घेत अतिक्रमण धारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अतिक्रमण न काढता रात्रदिवस काम सुरु ठेवून बांधकाम पूर्ण करुन घेतले आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे न्हावरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर रस्त्याच्या कडेला गावातील काही राजकीय व्यक्ती व पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण करत व्यावसायिक गाळ्यांचे काम सुरु केले, येथे अतिक्रमण झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या अतिक्रमणाविरोधात काही नागरिकांनी ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत, दरम्यान ग्रामपंचायत व तहसीलदार कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर ठिकाणच्या अतिक्रमण धारकांना नोटीस देत सदर ठिकाणचे अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिले,
मात्र दिवाळीच्या सुट्ट्यामुळे सर्व शासकीय कार्यालय बंद असल्याने गावातील अतिक्रमण धारकांनी सदर ठिकाणचे अतिक्रमण काढून न घेता शासकीय अधिकारी सुट्टीवर असल्याचा फायदा घेत चक्क बांधकामच पूर्ण करुन टाकल्याचा प्रकार समोर आला आहे,
या ठिकाणी अतिक्रमण करून गाळे बांधणाऱ्या व्यक्तींमध्ये राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे बोलले जात असून असून सदर व्यक्तींना शासनाचा धाक आहे कि नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे,
त्यामुळे या बांधकामावर प्रशासन काय कारवाई करते? केव्हा कारवाई करते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आले असून लवकरात लवकर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल