रत्नागिरी : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या किंवा सांभाळण्यास असमर्थता दर्शविणारे आपल्या पोटच्या पाल्याला निर्जन ठिकाणी, कचऱ्यात टाकून दिले जाते. त्यावर कोणाचे लक्ष गेले नाही तर हिंस्त्र जनावरे त्याचे लचके तोडतात. जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला जगण्याचा अधिकार आहे, तो अधिकार त्यांना मिळून दिला पाहिजे.

नकोशा बाळाला फेकून देऊ नये, असे आवाहन शासनामार्फत करण्यात येते. या बाळांना सांभाळण्याची जबाबदारी सरकार उचलते. जिल्हा बाल कल्याण समितीकडे मुलांना आणून द्यावे किंवा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी. त्याशिवाय महिला व बालविकास समिती, चाईल्ड लाईन, पोलीस व आरोग्य विभागही त्यासाठी कार्यरत राहते. 

नको असलेले मूल जन्माला आले तर....

• एखाद्या घटनेत मूल जन्माला आले आणि त्याचे पालनपोषण करता येत नसेल तर त्याला फेकून न देता पोलिसांना कळवावे. 

• जिल्हा बाल कल्याण समितीला याबाबत माहिती द्यावी. अन्यथा जिल्ह्यातील कार्यरत अनाथालयात ते बाळ नेऊन द्यावे.

येथे संपर्क साधावा

• चाईल्ड लाईन संस्था : लहान मुलांच्या संरक्षणासाठी चाईल्ड लाईन संस्था कार्यरत आहे. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर नकोशा बाळाची माहिती द्यावी.

• पोलीस : पोलिसांच्या ११२ क्रमांकावरही माहिती देता येते. पोलीस यंत्रणेकडून सर्व विभागांशी समन्वय साधून यामध्ये पुढाकार घेत अर्भकाच्या पालनपोषणासाठी समन्वय साधला जातो.

• महिला हेल्पलाईन : पोलिसांच्या महिला हेल्पलाईन येथे संपर्क साधून माहिती देता येते. त्यासाठी १०९१ हा हेल्पलाईन क्रमांक आहे.

• पोलिसांचा भरोसा सेल : २४ तास कार्यरत असतो. याठिकाणीही संपर्क साधून नकोशा असणाऱ्या अर्भकाची माहिती देता येते.

• बालकल्याण समिती : बालकल्याण समिती म्हणजे न्यायपीठ. या समितीकडे बाळाला दिल्यास पालक व मूल यांची माहिती गोपनीय ठेवली जाते.