राजापूर : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार असून या यात्रेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या यात्रेच्या नियोजनासाठी दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील काँग्रेस भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे यांनी दिली. देशभरातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्न लक्षात घेता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सात सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत निघालेल्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या मनातील सद्याचे राजकीय भय दूर करणे, त्यांच्या समस्या त्यांच्यापर्यंत थेट संपर्क करून संवेदनशिलतेने जाणून घेणे हे सामाजिक व राष्ट्रीय कार्य राहुल गांधी करीत असल्यामुळे देशातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद भारत जोडो पालाम आहे. ७ नोव्हेंबर २२ रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे भारतजोडो यात्रेचे आगमन होणार असून महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचे जंगी स्वागत होणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. या नियोजनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेस भवन रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आ. खलिफे यांनी केले आहे.
भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात; यात्रेत सहभागाच्या नियोजनासाठी जिल्ह्यात ३१ रोजी बैठक
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/10/nerity_b081b19f1ba5caf86aae7dd1d2bde2ee.jpg)