रत्नागिरी : दुर्मीळ समुद्री कासवांच्या मच्छीमारांच्या जाळयात अडकून मृत्यू होण्याच्या घटना आणि त्यापासून या कासव व अन्य समुद्री पाण्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाकडून मच्छीमारांमध्ये जनजागृती हाती घेण्यात आली आहे. मच्छीमारांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदतही दिली जात आहे. मागील वर्षभरात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील अशा 8 प्रकरणात शासनाकडून प्राप्त झालेली 1 लाखाची रक्कम वनविभागामार्फत मच्छीमारांना देण्यात आली.
मागील वर्षभरात रत्नागिरी जिह्यात 6 तर सिंधुदुर्गमध्ये 2 घटना समोर आल्या आहेत. रत्नागिरीमध्ये मच्छीमारांनी 4 ग्रीन सी टर्टल, एक हॉटबील सी टर्टल व 1 ऑलीव्ह रिडले सी टर्टल कासवांना जीवदान दिले आहे. सिंधुदुर्गमध्ये एक हॉकबील सी टर्टल तर एक ऑलीव्ह रिडले सी टर्टलला मच्छीमारांनी जीवदान दिले आहे. यावेळी मच्छीमारांच्या जाळ्यांचे थोड्या फार प्रमाणात नुकसानही झाले. या नुकसानभरपाईपोटी अनुदान देण्यात आले. रत्नागिरी जिह्यातील 6 प्रकरणांमध्ये 75 हजार तर सिंधुदुर्गतील 2 प्रकरणांमध्ये 25 हजार अशी प्रत्येकी साडेबारा हजार रुपयांची मदत वनविभागामार्पत मच्छीमारांना करण्यात आली.
किनारपट्टीवर दुर्मीळ कासव व अन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभाग व कांदळवन कक्षामार्पत सातत्याने हे प्रयत्न सुरु आहेत. दुर्मीळ समुद्री कासवांच्या मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिह्यात समुद्री कासवांना जीवदान देणाऱ्या मच्छीमारांसाठी आर्थिक मदत वनविभागामार्पत देण्यात आली आहे. त्यासाठी संरक्षित असलेल्या समुद्री कासव किंवा अन्य प्राण्यांना जीवदान देताना जाळ्यांचे नुकसान झाल्यावर या बाबत मत्स्य व्यवसाय खात्याकडे अर्ज दाखल करण्यात येतो. तेथून तो अर्ज वनविभागाकडे पाठवला जातो. या विषयाची दोन्ही विभागाकडून खात्री करुन वनविभागाकडून संबंधित मच्छीमारांना थेट मदतीचा निधी दिला जातो. मच्छीमारांमध्ये संरक्षित सागरी प्राण्यांबाबत जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी वनविभागाकडून हा उपक्रम राबवला जात आहे.