चिपळूण : ज्यांना कसलाही अधिकार नाही, राजकीय कुवत नाही असे लोक एका पक्षाच्या प्रमुखाला आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याला कानफटात मारण्याची भाषा करतात तेव्हा माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक शांत बसू शकत नाही. मला फार वेदना झाल्या त्यामुळे माझी सहनशीलता संपली. आता मला मारून जर शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मी मरणाला घाबरत नाही. राज्यात शिवसेनेला चांगले दिवस यावेत यासाठी मी पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली राज्यभर काम करणार आहे. कार्यकर्ते मला शांत बसू देत नाहीत त्यामुळे दिवाळीनंतर पुन्हा माझे दौरे सुरू होतील, असे प्रतिपादन जाधव यांनी केले. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव दिवाळीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. दिवाळीनंतर ते पुन्हा भाजपा आणि शिवसेनेतील ४० बंडखोर आमदारांचा समाचार घेण्याची शक्यता त्यांच्या समर्थकानी व्यक्त केली. आमदार जाधव यांनी भाजप नेतृत्व, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटातील आमदारांवर बोलू नये यासाठी त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. राज्यातील शिवसेना फुटल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेचे नेतेपद देण्यात आले. त्यांनी महाराष्ट्रात फिरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांनी टीका केली. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी आमदार जाधव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या गुहागर मतदार संघात त्यांच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू झाली आहे. गुहागरमध्ये राजकीय फटाके फुटणार असे सोशल मीडियावर संदेश पाठवले जात आहे. विशेष म्हणजे कुडाळ आणि मुंबईच्या सभेनंतर आमदार जाधव यांची सुरक्षा कमी करण्यात आली. आमदार जाधव यांच्यावर राज्यात गुन्हे दाखल होत असताना दुसरीकडे त्यांची सुरक्षा कमी करण्यात आली. या दरम्यान त्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला.